Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghadi) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीची वाय बी चव्हाण सेंटर इथं बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. ज्या 10 ते 15 जागांवर तिढा आहे त्यावर जवळपास मार्ग निघत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये जागा वाटपासाठी पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि अंतिम सूत्र ठरवलं जाईल. 10 ते 15 जागांवर निर्णय झाल्यानंतर जवळपास महाविकास आघाडीचे संभाव्य सूत्र समोर येणार आहे.
संभाव्य जागावाटपाचं सुत्र काय असणार?
काँग्रेस-103 ते 108
शिवसेना ठाकरे गट -90-95
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 80-85
मित्र पक्ष - 3 ते 6
आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात
दरम्यान, आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत असताना महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या नेमक्या कधी जाहीर होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पहिल्या याद्या यामध्ये अनेकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या उमेदवारी याद्या तयार आहेत. मात्र, आज जागा वाटपावर अंतिम निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी याद्या पक्षांकडून जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज बाळासाहेब थोरात दुपारी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम तोडगा काढून जागा वाटपावर निर्णय होईल त्यामुळे दुपारनंतर किंवा उद्या महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील, अशी शक्यता आहे.
आज जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार
आज जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात असलेले मतभेद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. बाळासाहेब थोरात आज (मंगळवारी) उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी जागा वाटपावर अंतिम चर्चा करणार आहेत. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्ष पहिली यादी जाहीर करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: