बीड: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारीसाठी अनेकांनी पक्षांतर केले आहे, तर काहींनी नाराजी व्यक्त करत पक्षांना रामराम ठोकले आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी केला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  भाजपा सदसत्वाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे.


पंकजा मुंडेंना मोठा धक्का


राजेंद्र मस्के यांच्यासोबत यावेळी कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र मस्के हे अनेक दिवस भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र आता राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर आता घडामोडींनी सर्व राजकीय समिकरणे बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वंजारी समाज आहे, लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण-जरांगे फॅक्टरचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या राजेंद्र मस्के यांच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारांना बळ मिळणार आहे, काही दिवसांपासून राजेंद्र म्हस्के शरद पवारांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती, त्यानंतर आज अखेर त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.


भाजप पक्षाला सोडताना राजेंद्र म्हस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा आहे. तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फायदा होणार आहे.