Dharashiv : रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ; दात मानवी की प्राण्यांचे? तपास सुरू
Dharashiv Shocking News : धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या रेशनच्या तांदळात दातांची कवळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dharashiv Ration Rice Incident : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या तांदळात चक्क दातांचा सांगाडा (कवळी) सापडल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रेशनच्या धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार या महिलेने शुक्रवारी 'गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार' या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य आणले होते. सायंकाळच्या वेळी त्यांच्या सुनेने भात शिजवण्यासाठी पिशवीतील तांदूळ निवडीसाठी चाळणीत घेतले. त्यावेळी तांदळात चक्क 6 ते 7 दातांची कवळी आढळून आली. हे पाहताच बिराजदार कुटुंबाला मोठा धक्का बसला.
Dharashiv Ration Crime : दात मानवी की प्राण्याचे? तपास सुरू
तांदळात सापडलेले हे दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे दात मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, अन्न शिजवण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Ration Grain Quality Issue : नागरिकांमध्ये तीव्र संताप
या धक्कादायक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जेवळी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांना वाटप करण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्यात अशी गंभीर निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित रेशन दुकान आणि पुरवठादारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
ही बातमी वाचा:






















