Thane Crime : क्षुल्लक कारणावरुन सख्या भावांवर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
Thane Crime News : क्षुल्लक कारणावरुन सख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
ठाणे : क्षुल्लक कारणावरुन सख्या भावांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला असून यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आवाज दिला पण थांबला नाही म्हणून दोन गटात जोरदार राडा झाला. या भांडणात दोघा सख्ख्या भावांवर प्राणघातलक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राड्यातून पळालेल्या तरुणाची घरात घुसून धारधार चॉपरने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या जोरदार राड्यात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एका आरोपीला मानपाडा पोलिसांनी (Manpada) अटक केली आहे. यश गुप्ता असं मयत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा सखा भाऊ जिगर गुप्ता हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
क्षुल्लक कारणावरुन वाद, एकाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत यश गुप्ता हा कल्याण पूर्वेतील चेतना चौक भागात कुटूंबासह राहत होता. 18 मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास यश गुप्ता हा आपल्या दोन मित्रासह कल्याण पूर्वेतील जन कल्याण रुग्णालयात जात होता. त्यावेळी त्याला आरोपी योगेश पटेल याने थांब म्हणून आवाज दिला. मात्र, तो थांबला नसल्याने त्याचा आणि सोबत असलेल्या मित्राचा पाठलाग करत कल्याण पूर्वेतील जय मल्हार हॉटेल समोरील रस्त्यावर गाठून दोन्ही गटात जोरदार राडा केला. त्यावेळी मृतक हा आरोपी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटून घरी पळाला.
सख्या भावांवर प्राणघातक हल्ला
यानंतर मुख्य आरोपी योगेश पटेल, राहुल पाठक, संतोष यादव या तिघांनी मृतक यशच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार चॉपरसारख्या हत्याराने वार केले. ही घटना पाहून मृतकचा भाऊ जिगर गुप्ता हा भावाला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आरोपी हल्लेखोरांनी जिगरच्या मानेवर चॉपरने वार करून त्यालाही गंभीर जखमी केले. सध्या जिगरवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
मुख्य आरोपी योगेश पटेल हा बांधकाम विकासक आहे, तर मयत हा खाजगी कंपनीत नोकरी करत होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 आणि 307 सह हल्लेखोर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हल्लेखोरांपैकी दोन आरोपी योगेश पटेल, राहुल पाठक हेही राड्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच संतोष यादव याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काबदाणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :