मुंबई : हिरो बनण्याचे स्वप्न भंगल्याने आणि देवावरचा विश्वास उडाल्याने नैराश्यातून तरुणाने मुंबईच्या मालाड परिसरातील मदर मैरी ग्रोटोवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दगडफेक करणाऱ्या आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली आहे. किरतनकुमार बलियार सिंग (वय, 33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.
मुंबईत हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ओडिसाहून आलेल्या किरतनकुमार याला चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली नाही. अशातच त्याचा देवावर असलेला विश्वास उडाला आणि चित्रपटसृष्टीत संधी न मिळाल्याने तो नैराश्यात गेला. यातूनच त्याने मालाड परिसरातील एका चर्च मधील मदर मैरी ग्रोटोवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील ऑनलाइन चर्च येथे एका तरुणाने मदर मेरी ग्रॉटोवर दगडफेक केल्याचा एक फोन पोलिसाना आला होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. सुदैवाने मूर्तीला कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते. मात्र, पुढे काही अनर्थ होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटवत त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुंबईत चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी आला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्याची आई आणि भावाचे निधन झाल्यामुळे तो एकटाच होता. चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे त्याने एका चायनीज गाडीवर काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु, चित्रपटात काम न मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला आणि देवावरचा विश्वास उडाला. या नैराश्यातूनच चर्चमधील मदर मेरी ग्रोटोवर दगडफेक केली असं तपासात आढळून आले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती झोन 11 चे डीसीपी अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.
पोलिसांकडून तात्काळ कारवाई
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चर्चच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी या फुटेजमध्ये संशयित तरूण स्पष्टपणे दिसून आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संबंधित तरूणाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. यावेळी त्याने नैराश्यातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली.
महत्वाच्या बातम्या