मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्याविरोधात चौकशी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ( NCPCR ) दिल्ली पोलिसांना पत्र पाठवलं आहे. संजय राऊत आणि राधव चढ्ढा यांनी राजकीय कारणासाठी ट्वीटरवर लहान मुलीचा फोटो वापरलाल्याने त्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांनी कथितपणे फोटो शेअर करण्याचा उद्देश म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआयच्या तपासापासून लक्ष हटवणे हा होता, असे बाल हक्क आयोगाचे निरीक्षण आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि राघव चड्ढा यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सबद्दल तक्रारी आल्या आहेत. या दोघांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मनीष सिसोदिया शाळेत लहानग्या विद्यार्थीनीसोबत दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास आणि आवश्यक कारवाईसाठी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्याची प्रत दिल्लीच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आली आहे. याशिवाय आयोगाने दिल्ली पोलिसांना बाल न्याय कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
"मुलीच्या संमतीशिवाय फोटो शेअर करून आणि वापरून त्यांच्या वैयक्तिक अजेंड्याचा प्रचार करण्यासाठी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल" एफआयआर दाखल केला जाईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
कशामुळे कारवाई?
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी एका चिमुकल्या विद्यार्थीनीसोबत संवाद साधत असलेल्या सिसोदिया यांचा फोटो शेअर करत भाजप सरकारवर टीका केली होती. "भाजप ज्या प्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करत आहे ते पाहून मला भीती वाटते की, भविष्यात भाजपचे नेते सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचे काय होईल. जर त्यांचा असाच छळ झाला तर? त्यांच्या मदतीला कोण येईल? असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. या ट्वीटमध्ये लहान मुलीचा फोटो वापरल्याने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने संजय राऊतांविरोधात दिल्ली पोलिसांना पत्र पाठवलं आहे.
महत्वाच्या बातम्या