Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोटा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्ध्या तासांपूर्वी म्हणजेच सहा वाजेदरम्यान सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघातातील टेम्पोची ओळख देखील पटत नाहीये. या अपघातानंतर टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर सांडले होते. तर दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे.
जखमींना रुग्णालयात हलवले!
सिल्लोड ते पाचोरा महामार्गावर एसटी बस आणि टेम्पोचा अपघाताची घटना समोर आल्यावर, परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली.
छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलेल्या जखमी रुग्णांची नावं
एकनाज देवराव पाटील, महारू देवराव पाटील, वसंत पांडुरंग पाटील, रामा लक्ष्मण दांडगे, तुकाराम कडुबा सावळे, रजिया सिराज देशमुख, हलिमा आरेफ खान, फकिरा कौतीक मोरे, पंडीत बाबूराव शिंदे, सुभद्रा गणेश गोर, शंकर जमनाजी भालोद, सरस्वतीबाई आनंदा फोलाने, युवराज नारायण पाटील, किसन उखर्ड शेळके, कडुबाई सुरेश फोलाणे, मधुकर राजधर आमटे, उषा धर्मा भालकर, रुपाली जगदिश विसपूते, संदिप गुलाबसिंग बैनाडे, विष्णु रामू भालकर, रुपाली अकिल पटेले