Crime News : धक्कादायक... शाळेतील जुन्या मित्राशी पुन्हा प्रेमसंबंध, आईने पोटच्या तीन लेकरांना दिलं दह्यातून विष, नवरा मात्र बालंबाल बचावला!
Crime News : आपल्या प्रियकरासोबत राहता यावे यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अंत करण्याचा निर्णय महिलेने घेतला होता.

Crime News : हैदराबादमधून (Hyderabad News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या प्रियकरासाठी अत्यंत अमानुष पाऊल उचलले आहे. तेलंगणातील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय रजिता या महिलेने आपल्या तीन लहान मुलांना विष देऊन संपवल्याचा आरोप आहे.
रजिताने आपल्या शाळेतील जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या नव्या नात्यासोबत आयुष्य जगण्यासाठी तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अंत करण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात 12 वर्षांचा साई कृष्णा, 10 वर्षांची मधु प्रिया आणि 8 वर्षांचा गौतम यांचा दुर्दैवी अंत झालाय.
दह्यात मिसळलं विष
27 मार्च रोजी रजिताने जेवणात दिलेल्या दह्यात विष मिसळलं होतं. मात्र, तिचा पती चेन्नय्या याने त्या दिवशी जेवण न करता ड्युटीवर निघून गेल्यामुळे तो वाचला. मात्र तिन्ही मुलांनी ते विषारी दही खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या दिवशी सकाळी चेन्नय्या घरी परतला असता त्याला मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तर रजिता पोटदुखीची तक्रार करत होती. चेन्नय्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेले. सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण कौटुंबिक वादामुळे घडले असावे, असे वाटले.
पोलीस अधिकारीही चक्रावले
पोलिसांच्या सखोल तपासानंतर सत्य हळूहळू समोर येत गेलं. रजिताने नव्या प्रियकरासाठी आपल्या मुलांचा बळी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हा घृणास्पद आणि विकृत कट समजल्यानंतर पोलीस अधिकारी देखील चक्रावले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, रजिता आणि तिच्या प्रियकराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























