Fraud Case Accused Arreted : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबली'च्या जोडीला गजाआड करण्यास यश मिळाले आहे. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीच्या लग्नासाठी वर मुलगा हवा असल्याची बतावणी करून ठगणाऱ्या बंटी बबलीवर धुळे शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सध्या लग्नाळू मुलांसाठी मुलगी हवी म्हणून बहुतांशी पालक मुलाकडचे कुटुंबीय मध्यस्थामार्फत लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मध्यस्थी करणाऱ्यांना दलालीच्या स्वरूपात लाखो रुपये देखील जातात. याचाच फायदा घेत जळगाव जिल्ह्यातील बंटी-बबलीने लग्नाळू मुलांच्या कुटुंबियांना फसवून लाखोंचा गंडा घालण्याच रॅकेटच सुरू केल होतं.
असा घातला जायचा गंडा
लग्नाळू मुलांना नवरी मुलगी दाखवण्यात यायची. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर विवाह सोहळा पार पाडायचा. त्यानंतर विवाह करून घरी आलेली नववधू पुढील काही दिवसातच घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारून पसार व्हायची. अशा प्रकारे या बंटी-बबलींनी अनेकांना गंडा घातला होता.
या बंटी-बबलींचे कारनामे काही सामाजिक कार्यकर्त्यांसमोर आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेमाताई हेमाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंटी-बबलीचा शोध सुरू केला. हे दोघेही जळगावातील असल्याचे समोर आले. या सामाजिक कार्यकर्त्यांनी विवाहासाठी मुलगी हवी असल्याचे सांगत त्यांना मध्यस्थीसाठी धुळ्यात आणले. त्याच वेळी फसवणूक झालेल्या कुटुंबीयांना या कार्यकर्त्यांनी बोलावले होते. फसवणूक करणारे हेच दोघे असल्याचे फसवणूक झालेल्यांनी सांगितले.
अखेर या प्रकरणी धुळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवत या बंटी-बबलीना बेड्या ठोकल्या. धुळे पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, त्यांचा देखील तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या रॅकेटमध्ये सामील असलेल्या ठग्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल असे धुळे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Crime : मुंबई हादरली; अँटॉप हिल आणि लालबाग-परळमध्ये हत्येच्या घटना, परिसरात खळबळ
- Crime News : परभणी: खळबळजनक! रुग्णालय परिसरात दगडाने ठेचून एकाची हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha