Crime News Maharashtra : परभणीच्या सेलु उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी गेटवरच  (Murder in front of Hospital Gate) एका कामगाराची दगडाने ठेचून हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या झालेल्या कामगाराची ओळख पटली आहे. विशाल सदाफळे असे त्यांचे नाव आहे. 


विशाल सदाफळे (वय 50 वर्ष) हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी आहेत. विशाल सदाफळे हे सेलू येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. आज, मंगळवारी सकाळी सेलू उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर येत होते. त्यावेळी त्यांना रुग्णालय ओपीडीच्या प्रवेशद्वाराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व्यक्ती दिसली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. त्यानंतर मयत व्यक्तीची ओळख पटली. विशाल सदाफळे यांची दगडाने ठेचून हत्या केली असल्याचे समोर आले. 


सदाफळे यांची हत्या नेमकी कोणी केली असावी, हत्येचे नेमके कारण काय? लूटमार की जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेलू उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने प्रवेशद्वाराजवळ खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha