अमरावती (Amaravati) : एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाला जिवंत जाळून तरुणाने स्वत:ही पेटवून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. वरुड तालुक्यातील वंजडी इथे रविवारी रात्री हा प्रकार घडला. लता सुरेशराव भोंडे आणि प्रणय सुरेशराव भोंडे अशी जाळून हत्या (Murder) केलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर आशिष ठाकरे असं मृत आरोपीचं नाव आहे.
आई आणि मुलाला जाळून मारण्याचं कारण काय?
आशिष ठाकरे या तरुणाचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही वर्षे ते सोबत होते आणि एकत्र राहत होते. परंतु त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. वाद वाढत गेला आणि त्यांच्यातील नातं तुटलं. काही महिन्यांपूर्वी ते दोघे वेगळे झाले. प्रियकराशी भांडण झाल्यानंतर प्रेयसी (Girlfriend) आपल्या घरी आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ पुन्हा तरुणीला तरुणासोबत पाठवण्यास तयार नव्हते. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचं भांडणही झालं होतं.
भांडणाचा राग मनात ठेवला आणि...
याच वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना हा तरुण तिच्या घरी गेला. त्यानंतर आशिष ठाकरेने वरुड तालुक्यातील वंडली इथे रात्री एक वाजताच्या दरम्यान एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाची जाळून हत्या केली. त्यानंतर आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन आरोपी तरुणाने सुद्धा स्वत: जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) यांची जाळून हत्या करण्यात आली. तर आरोपी आशिष ठाकरे (वय 25 वर्ष) याने स्वतः जाळून घेतलं. यात तो गंभीर भाजला गेल्याने त्याचा देखील मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा