मुंबई: राज्यातील गढूळ राजकारणावर कवींनी बोललं पाहिजे असं वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलंय. ठाण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज बोलत होते. कुसुमाग्रजांच्या (Kusumagraj) असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झाला. पण, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
मनसे नेते अभिजित पानसे यांच्या कुसुमाग्रजांच्या साहित्य पुस्तकाचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी होणार आहे. रावण पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या कथा, ललित लेख कविता अनुवाद यांचं असंग्रहित साहित्य या पुस्तकाच्या माध्यमांतून वाचकांना मिळणार आहे.
राजकारणावर कवींनी बोललं पाहिजे
राज ठाकरे म्हणाले, आपल्याच लोकांना आपण मोठे करत नाही. परदेशात आपली लोक कोण? आमची माणसे किती मोठी? सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्याकडे मात्र हा प्रयत्न होताना दिसत नाही. आपल्याकडे संमेलन भरत लोकं येऊन बोलतात पण पुढे काही होताना दिसत नाही. आपल्या आजूबाजूला जे राजकीय वातवरण आहे. त्यावर भाष्य होणे गरजेचे आहे आणि त्याचवेळी होणे गरजेचे आहे. या परिस्थिवर कवी बोलले तर त्यांचे महत्त्वही वाढेल. राजकारणावर कवींनी बोललं पाहिजे. फक्त आम्ही कविता करतो, इतक्या कविता करतो पण आम्हाला महत्त्व प्राप्त होत नाही असे म्हटले जाते. परंतु महत्त्व प्राप्त होईल असे पाऊल कवींनी उचलले पाहिजे.
आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही : राज ठाकरे
महाराष्ट्रात अनेक मोठ्या माणसांचा जन्म झाला. पण, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. लहानपणी कविता फक्त पाठ करायचो पण त्या समजून घ्यायच्या असतात, हे फार उशीरा कळाले.महराष्ट्रात सध्या जी परिस्थिती दिसते. अनेक मंत्र्याना काहीच माहित नसते. आपण कुणाला निवडून देतोय हे जनतेला कळायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी वाचून दाखवली कुसुमाग्रजांची कविता
पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने । करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा । भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥