परभणी : पतीला भीती दाखवण्यासाठी गळफास घेण्याचा प्रयत्न करणं एका महिलेला महागात पडला असून, यात खरोखरच गळफास बसल्याने या महिलेचा जीव गेला आहे. महिला आणि तिचा पती बामणी गौरी सणानिमित्त गावी आले होते. दरम्यान, पती गावातील गणपती पाहण्यासाठी घराबाहेर जात असल्याने पत्नीने विरोध केला. तसेच, पतीला भीती दाखविण्यासाठी गणपतीकडे जाऊ नका, अन्यथा मी  फाशी घेईल असे पत्नी म्हणाली. पण,पतीने हसत हसत घे फाशी म्हणत घरातून निघू लागला. त्यामुळे, पतीला भीती दाखवण्यासाठी तिने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातच खरोखरच गळफास बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. परभणीच्या (parbhani) जिंतूर तालुक्यातील कावी येथे ही घटना उघडकीस आली आहे. सायली रामभाऊ काठमोरे (वय 19 वर्षे, रा. कावी, ता. जिंतूर) असे मयत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


अधिक माहितीनुसार, लक्ष्मण काठमोरे आणि त्यांची पत्नी सायली हे दोघेही गौरी सणानिमित्त गावाकडे आले होते. दरम्यान, घरात सायंकाळी महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी सुरू होती. याचवेळी लक्ष्मण हे गणपतीकडे जातो असे म्हणून घरातून बाहेर पडण्यासाठी निघाले. त्यावर, सायलीने तुम्ही गणपतीकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच तुम्ही जर गेलात तर मी फाशी घेईल, असे म्हणाली. सायलीचं हे म्हणणं लक्ष्मण यांनी मनावर न घेता हसत हसत घे फाशी असे म्हणत घराबाहेर पडू लागले. त्यामुळे सायलीने पतीस भीती दाखवण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यास अडकविला आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण असे करतांना तिला खरचं गळफास बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे घरच्यांना हा सर्व प्रकार लक्षात येईपर्यंत सायललीची प्राणज्योत मावळली होती. 


पतीला भीती दाखवायला गेली अन्...


गौरी सणानिमित्त लक्ष्मण काठमोरे  आणि त्यांची पत्नी सायली दोघेही गावाकडे आले होते. दरम्यान, सणासुदीचा काळ असल्याने घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. गावाकडे आल्याने लक्ष्मण गणपती पाहण्यासाठी घराबाहेर जाऊ नयेत म्हणून, सायलीने त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. एवढच नाही तर त्याला भीती दाखवण्यासाठी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण खरोखरचा गळफास बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


पोलिसांची घटनास्थळी धाव..


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बामणी पोलीस ठाण्याचे सपोनि कृष्णा घायवट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. तसेच, पंचनामा करून मयत सायलीचे शवविच्छेदन जिंतूर येथील शासकीय दवाखाना येथे करण्यात आले. तर, या प्रकरणी मयत सायलीच्या आई-वडिलांच्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parbhani : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला, जन्मदात्या मुलानेच बापाचा घात केला