सुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या अधिकाऱ्याला आमदाराच्या जावयाची मारहाण
Gadchiroli News : अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे काम सांभाळणारे लॉयडस् मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्याला आमदाराच्या जावयाने मारहाण केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांना अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर व इतरांनी मारहाण केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मारहाणीच्या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये अतुल खाडीलकर यांच्यासोबत ऋतुराज हलगेकर यांची बाचाबाची झाली. त्यातूनच ही मारहाण झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अतुल खाडीलकर यांनी अहेरी पोलीस स्टेशन येथे प्राथमिक तक्रार नोंदवली आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऋतुराज हलगेकर आणि त्यांचे भाऊ जयराज हलगेकर यांचा सुरजागड लोह प्रकल्पात ट्रान्सपोर्टचं काम आहे. त्याच्याशी निगडित मुद्यावरून वाद निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. अतुल खाडीलकर यांनी हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईकाबाबत असंसदीय भाषेचा वापर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या हलगेकरांनी इतर सहकाऱ्यांसह गेस्ट हाऊसमध्ये दरवाजा तोडून खाडिलकर यांना मारहाण केली असल्याचे म्हटले जात आहे.
खाडिलकर यांच्या तक्रारीनंतर अहेरी पोलिसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, जे. डी. भोजराज व इतर जणांवर भारतीय दंड विधान कलम ४५२, ३२३, ४२७, १४३, १४७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास अहेरीचे ठाणेदार शाम गव्हाणे हे करीत आहेत.
या प्रकरणी ऋतुराज हलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलं की, खाडिलकर यांनी माझ्याबद्दल आणि नातेवाईकांबाबत सहन न करता येणारे अपशब्द वापरले. त्यामुळे वाद झाला. याबाबत प्रत्यक्ष फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मात्र, खाडिलकर यांनी त्यावेळीही तिथे असंसदीय शब्दांचा वापर केला. त्यातून वाद झाला आणि धक्काबुक्की झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
