Crime News : हॉटेलमध्ये जेवायला बसले अन् तिथेच गेम झाला; पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : बनावट 500 रुपयांच्या नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पाचोड, छत्रपती संभाजीनगर : पाचशे रूपयांच्या हुबेहूब नोटा कमी दरात बाहेरून खरेदी करून त्या नोटा खऱ्या असल्याचे सांगून बाजार पेठेत चालणाऱ्या दोन तरुणांना पाचोड ता.पैठण पोलिसांनी सोमवारी (6 नोव्हेंबर) हॉटेल निसर्ग या ठिकाणाहून सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अटक केली. कुंदन सुधाकर जगताप (वय 25 वर्षे ) रा.अंकुशनगर, महाकाळा ता. अंबड, सचिन मधुकर जाधव( रा.शहगड) ता.अंबड जि.जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर एक जण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये 500 रूपयांच्या बनावट नोट या सध्या चलनात येत आहे. या नोटा घेऊन एक व्यक्ती पाचोड परिसरात येणार असल्याची माहिती पाचोड पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सापळा रचला. पाचोड येथील हॉटेल निसर्ग या ठिकाणी सोमवारी (6 नोव्हेंबर) रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान कुंदन सुधाकर जगताप (वय 25 वर्षे ) रा. अंकुशनगर, महाकाळा ता.अंबड जि.जालना हा या ठिकाणी स्विफ्ट कार क्रमांक (एम एच 04 जी एम 2552) ही घेऊन जेवणासाठी थांबला होता. यावेळी पाचोड पोलिसांना त्याच्यावरती संशय आला. त्यानंतर त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 500 रुपये दराच्या 13 नोटा आढळून आल्या. नोटाचे लाईटच्या उजेडांमध्ये बारकाईने निरीक्षण केले असता. त्या बनावट असल्याचे आणि काही नोटांचा क्रमांक एक सारखा असल्याचे दिसून आले. त्यावरुन सदरच्या नोटा या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याने या नोटा सचिन मधुकर जाधव (रा.शहगड) ता.अंबड जि. जालना याच्यांकडून 5000 रुपयांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले.
यावरून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक संतोष माने पोलीस, उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस नाईक फेरोज बर्डे, पोलीस नाईक चव्हाण, मधुकर जाधव यांची अंगाची झडती घेतली असता. त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये बाळगलेल्या एकूण 31 बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यावेळी त्याला विश्वासात घेवून बनावट नोटा कोणाकडून आणल्या याबाबत विचारपूस केली असता. त्याने सदरच्या बनावट नोटा या त्याचा मित्र आप्पासाहेब पवार (रा. शहागड) ता. अंबड याच्याकडुन घेतल्याचे सांगितले. त्यावरुन त्याचे घरी जावून त्याचा शोध घेतला. आप्पासाहेब पवार हा घरातून फरार झालेला होता. याप्रकणी 500 रुपयांच्या घेवून नोटा खऱ्या म्हणून वापरण्यासाठी जवळ ठेवल्याचे चौकशीत समोर आले.
पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 489 ब, 489 क 34 सह कलम 4/25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांच्या ताब्यातून 500 रूपयाच्या दराच्या 44 बनावट नोटा, धारदार पाते असलेला सुरा, मोबाईल हॅन्डसेट, मारुती स्वीफ्ट कार असा एकूण 4 लाख 75 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोउपनि सुरेश माळी, पोह अभिजित सोनवणे, पोना पवन चव्हाण, पोना फिरोज बरडे यांनी केली आहे.