शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना शहर अध्यक्षासह 6 जणांना अटक; घरात शस्त्रसाठा आढळल्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
Chandrapur Crime News : चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना शहर अध्यक्ष शहबाज सुबराती शेख ला पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांना हवी असलेली पिस्तुल सापडल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या (Chandrapur Shivsena Thackeray Group) युवासेना शहर अध्यक्ष शहबाज सुबराती शेख ला पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांना हवी असलेली पिस्तुल सापडल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. नुकतेच चंद्रपुर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा सापडल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे (Vikrant Sahare) यांच्या घरी पोलीस पथकाने कारवाई केली असता यामध्ये एकूण 40 काडतुसे सापडली होती.
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील घरात 4 तास पोलिसांनी शोध अभियान राबवत हा प्रकार उजेडात आणला होता. या तपासाचे धागेदोरे आता आणखी पुढे गेल्यानंतर आता या प्रकरणात विक्रांत सहारेचा भाऊ विशाल सहारेनी शहाबाजकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शहबाज शेख याच्याकडे देशी बनावटीची मॅक्झिन प्रकारातील पिस्तुल आढळून आली आहे. त्यामुळे आता शहबाजला देखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या धाडीत 40 काडतुसांसह मोठा शस्त्रसाठा जप्त
चंद्रपुरात 3 दिवसांपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी धाड घालून 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त केली होती. मात्र त्याच्याकडे बंदूक न सापडल्याने पोलीस या बंदुकीचा कसून शोध घेत होते. चंद्रपूर जिल्ह्यात गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. धाडीत 40 काडतुसांसह एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. मात्र त्यावेळी पोलिसांना बंदूक मिळाली नसल्याने पोलिसांनी तीचा देखील शोध सुरूच ठेवला.
पोलिसांचे पथक बिहार येथे तपासासाठीही रवाना
दरम्यान, जप्त करण्यात आलेली ही सर्व काडतुसे टोळीयुद्धासाठी वापरले जाणार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. परिणामी या प्रकरणात विक्रांत सहारे याचा भाऊ विशाल सहारे, विक्रांतचा मित्र पवन नगराळे यांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी या बाबतचा अधिक खुलासा केलाय. या प्रकरणी आतापर्यंत अटकेतील संशयित आरोपींची संख्या 6 वर गेली आहे.तर पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील दानापूर येथे तपासासाठीही रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात आता पोलिसांची विविध पथके समाविष्ट करण्यात आले असून विविध पैलूंचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तर या प्रकरणात राज्याच्या बाहेर देखील काही कनेक्शन जुळले आहे का? या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
चंद्रपुरात तब्बल 1200 किलो गोमांस जप्त,बर्फाच्या लादीतून तस्करी; 5 जणांना अटक