बाळ जन्मल्यानंतर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण उघड, महाबळेश्वरमधील खळबळजनक घटना, 13 जणांविरुद्ध गुन्हा
महाबळेश्वरात (Mahabaleshwar) खळबळजनक घटना घडली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape case) केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसुती करुन बाळ मुंबईमध्ये एकाला दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
सातारा : मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात (Mahabaleshwar) खळबळजनक घटना घडली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape case) केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसुती करुन प्रकरण दडपण्यासाठी झालेले बाळ हे मुंबईमध्ये एकाला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोन युवकांना अटक केलीच शिवाय हे प्रकरण मिटवण्यासाठी ज्यांनी मदत केली अशा सर्व 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिवसेना नेते डी एम बावळेकर यांच्या दोन मुलांचाही यात समावेश आहे. महाबळेश्वरातील एका 15 वर्षाच्या मुलीवर महाबळेश्वरातीलच आबा उर्फ सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे या दोन युवकांनी अत्याचार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली. हे प्रकरण दडपण्यासाठी तीची प्रसुती घरातच करण्यात आली होती. जन्माला आलेले बाळ कांदीवली मुंबई येथील सुनिल चौरसिया यांना दिले होते.
हा सर्व प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या दोघांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांचा मुलगा योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर यांच्या मदतीने हे बाळ कांदीवली येथील चौरसिया या कुटुंबाला हे बाळ दिले होते. याबाबत पोलिसांनी या सर्व प्रकरणात 13 जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर यात चौघांना अटक झाली असून शिवेसेना नेते डी एम बावळेकर यांच्या दोन मुलांसह 9 नऊ जण फरार झाले असून सर्वांचा पोलिस शोध घेत आहेत.
कसं बाहेर आलं प्रकरण
पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण बाहेर पडले. बाळ मुंबई येथील चौरसिया कुटुंबाला बाँड करुन दिले. आनंद हिरालाल चौरसिया, सुनिल हिरालाल चौरसिया आणि पुनम हिरालाल चौरासिया या कुटुंबाला दिले. सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर यांनी बाँन्ड खरेदी केला. बॉन्ड महाबळेश्वरातील सनी हॉटलमध्ये केला. चौरसिया कुटुंबाने हे बाळ घेऊन जाण्यापूर्वी त्याची पूजाअर्चना ही महाबळेश्वरातीलच सनी हॉटेलमध्येच केली. यासर्व प्रक्रियेतील बाँन्ड करणारा वकिल आणि विधी करणारा जंगम या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. चौरसिया कुटुंबाला हे बाळ दत्तक देताना पैसे घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या बाळ हे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या शेजारी आता पोलिस ठेवण्यात आले आहेत. बाँन्ड झाला त्यावर या सर्व आरोपींच्या सह्या आहेत.