बुलढाणा : राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातून ही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या (Buldhana Crime News) मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उजेडात आली आहे. यात दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्पत्यालाही मारहाण केली आहे. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू (Crime News) झाला आहे. तर डॉ.गजानन टेकाडे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटणेमुळे दाभाडी गावासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मारहाणीत महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण केली. ज्यात डॉ.माधुरी टेकाडे यांचा जागीच मृत्यू झालाय. तर या हल्ल्यामध्ये गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या डॉ. गजानन टेकाडे यांच्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई करत या दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. मात्र जिल्ह्यात अलीकडच्या काळात लुटमार, दरोड्याच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अवैध रेतीच्या ट्रकचा तहसीलदारांकडून पाठलाग, मात्र पुढे असं काही घडलं की...
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद महामार्गावर अवैध रेतीच्या ट्रकचा तहसीलदाराच्या वाहनाने पाठलाग केला. मात्र तहसीलदाराचे वाहन आपला पाठलाग करत असल्याचे पाहून ट्रक चालकाने ट्रकमधील रेती महामार्गाच्या मध्यभागी टाकून ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. अंधारात महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्याने या रेतीवर धडकून अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अंधार असल्याने अनेक दुचाकी या रेतीच्या ढीगाऱ्यावर धडकून जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र या अपघाताना व जखमींना तहसीलदार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत रात्री महामार्गावर नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. तर काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांच्या शिरजोरीचा आणखी एक प्रकार या निमित्याने पुढे आला आहे.
हे ही वाचा