मुंबई : ऑनलाइन हर्बल पावडर आणि कच्चे वैद्यकीय साहित्य विक्री करण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या एक टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मोहम्मद हुसैन तुकाराम शेख उर्फ शिवाजी तुकाराम बेनुगडे, डॉक्टर त्रिजुगीलाल बुधराम कुर्मी, सलीम अनवरुद्दीन शेख या तीन सदस्यांना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे. या टोळीतील व्यंकेटेश नाडर, लालजी, आरिफ शेख यांच्यासह जेरी, संडे आणि एडवर्ड या नायजेरियन नागरिकांचा पोलीस शोध घेत आहेत.


हरियाणा येथील एका कॅबिनेट मंत्र्यांचे भाचे असलेले नफिस अहमद मोहम्मद युनूस खान यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घोड्याच्या उपचारासाठी एक हर्बल पावडर ऑनलाइन मागवली होती. मोहम्मद हुसैन तुकाराम शेख आणि त्यांच्या साथीदाराकडे या पावडरीची ऑर्डर दिली होती. मात्र यात त्यांची 1 लाख 69 हजार रुपयांची या टोळीने फसवणूक केली आणि आपले सर्व संपर्क क्रमांक बंद केले. याप्रकरणी नफिस यांनी चेंबूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून झालेल्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. याबाबत गुन्हा दाखल होताच चेंबूर पोलिसांनी पथक तयार करून या गुन्ह्याचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यात एक मोठी टोळी सहभागी असल्याचा आणि देशभरात अनेकांना या टोळीने फसविल्याचा संशय पोलिसांना होता.


मोहम्मद हुसेन तुकाराम शेख या आरोपीने गणेश नगर चेंबूर येथे गंगोत्री इमारतीमध्ये एक ऑफिस लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्याचे खोटे सांगून भाड्याने घेतले होते. या जागेच्या करार नाम्याचा वापर करीत त्याने बँकेत खाते, उद्योग आधार आणि जीएसटी देखील काढले होते. मात्र गेले दोन महिने हे ऑफिस बंदच होते. पोलिसांना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचे नवी मुंबई मधील पत्ते मिळाले. मात्र तिथे देखील त्याने असेच करून घरे सोडली होती. या जागांच्या करार नाम्यातून त्याने मोबाईल सिम कार्ड देखील खरेदी केले होते. यावरून पोलिसांना तो नेरुळ परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून त्याला अटक केली. 


अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून, त्याचा साथीदार डॉक्टर दिनेश कुर्मीला पोलिसांनी नवी मुंबईमधून अटक केली. या डॉ. दिनेशने दिलेल्या माहितीनुसार, यातील आणखी आरोपी सलीम शेख, व्यंकटेश नाडर आणि आरिफ शेख यांची पोलिसांना माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी सलीम शेखला धारावी येथे आला असता अटक केली. सलीमकडून या टोळीत जेरी, संडे आणि एडवर्ड हे नायजेरियन नागरिक देखील असल्याचे पोलिसांच्या समोर आले. तसेच या टोळीने अशा प्रकारे करारनामे तयार करून 16 विविध बँकेत खाते उघडून त्यातून विविध लोकांकडून हर्बल पावडर, कच्चे वैद्यकीय साहित्य ऑनलाइन विक्रीच्या नावाखाली फसविलं असल्याचे समोर आले आहे. या 16 बँकेची खाती तपासली असता तब्बल पाच कोटी पर्यंत या टोळीने लोकांना गंडा घातला असल्याचे समोर आले. तसेच महाराष्ट्रसह दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, केरळ अशा विविध राज्यातील फसवणुकीचे अनेक गुन्हे देखील उघडकीस येत आहेत. सध्या या टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून सहा जणांचा चेंबूर पोलीस शोध घेत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :