Bhusawal Murder News Updates :  : भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 8 संशयितांपैकी एका संशयितास भुसावळमधून तर गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्या संशयीतास धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत. 


नेमकं काय घडलं? (Bhusawal Murder News)


भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून माजी नगरसेवक संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरिमाता मंदिर परिसरजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांचेवर अंदाधुंद गोळीबार केल्यानं ते कारमध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केलं होतं. 


या घटनेची माहिती भुसावळ शहरात वाऱ्यासारखी पसरली, काही वेळातच हजारो लोक खासगी रुग्णालयाच्या आवारात एकत्र जमले. त्या ठिकाणी तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. 


घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीनं संपूर्ण भुसावळ शहरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे याचा तपास भुसावळ पोलिस करत आहेत. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 


या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह लागले आहेत. 


भुसावळमध्ये व्यापाऱ्यांचा बंद


भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली असून गुरुवारी व्यावसायिकांनी स्वयंघोषित बंद पाळला आहे. या बंदमुळे भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाली असून बाजारपेठेतील मोठी उलाढाल देखील ठप्प झाली.


पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसेंनी केला आहे.  यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.


ही बातमी वाचा :