Bhima Sahakari Sakhar Karkhana, Mohol : भीमा सहकारी साखर कारखान्याने (Bhima Sahakari Sakhar Karkhana) एका शेतकऱ्याच्या 67 टन उसाचे बिल थकवले आहे. दरम्यान, शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर घेतला होता. या ट्रॅक्टरचे हप्त्यांच्या वसुलीसाठी फायनान्सने तगादा लावल्याने शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिलाय. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा सोलापुरातील हा कारखाना आहे. दरम्यान, मोहोळ तालुक्यातील संतप्त शेतकऱ्याने उसाचे बिल दिले नसल्याने आपला चालू ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला. मच्छिन्द्र पवार असे या संतप्त शेतकऱ्याचे नाव असून तो मोहोळ तालुक्यातील रहिवासी आहे.
दुसऱ्या हप्त्याची रक्कम 1 लाख 500 रुपये कारखान्याने दिली नाही, शेतकऱ्याचा आरोप
वर्षभरापूर्वी मच्छिन्द्र पवार या शेताकऱ्याने खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित भीमा सहकारी साखर कारखान्याला 67 टन ऊस घातला होता. मच्छिन्द्र पवार या शेतकऱ्याच्या ऊस बिलाची दुसऱ्या हप्त्याची रक्कम 1 लाख 500 रुपये कारखान्याने दिली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. कारखान्याचे चेअरमन आणि अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून बिलाची मागणी केली मात्र त्यांनी बिल दिले नसल्याचा आरोपही शेतकरी मच्छिंद्र पवार यांनी केला आहे.
फायनान्स कंपनीने आणखी त्रास दिला तर मी आणखी काय करून घेइन हे तुम्हाला माहिती आहे
कोरोना काळात फायनान्सद्वारे लोन घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला, त्यामुळे फायनान्स कंपनीने हप्त्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे मी माझा ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला. जर मला फायनान्स कंपनीने आणखी त्रास दिला तर मी आणखी काय करून घेऊन हे तुम्हाला माहिती आहे, असा धमकीवजा इशाराच मच्छिंद्र पवार या संतप्त शेतकऱ्याने दिलाय. दरम्यान, भीमा सहकारी साखर कारखान्याकडून अद्याप याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. कारखान्याचे चेअरमन आणि अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून बिलाची मागणी केली मात्र त्यांनी बिल दिले नसल्याचा आरोपही शेतकरी मच्छिंद्र पवार यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, स्वा. सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य भोवणार?