जळगाव : जळगावच्या (Jalgaon) भुसावळ (Bhusawal) शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे (Santosh Barse) यांच्यासोबत इतर तिघे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

  


एकनाथ खडसे म्हणाले की, काल रात्री भुसावळ शहरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. आठ दिवसात जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहेत.  मागील आठवड्यात जळगाव शहरात देखील अशीच घटना घडली होती.


पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत


एकंदर पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत आहे. मी पोलीस अधीक्षकांची भेट घेत टोळी युद्ध, गुंडागर्दी जिल्ह्यात वाढली आहे यावर नियंत्रण आणावे, असे सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक शब्द देखील काढला नाही. यावरून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती बिकट झाली आहे हे दिसून येते. यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हटले आहे.


भुसावळमध्ये नेमकं काय घडलं? 


भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून माजी नगरसेवक संतोष बारसे हे कारमधून जात होते. यावेळी मरिमाता मंदिर परिसरजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे कार मध्येच जागेवर कोसळले. यावेळी पोलिसांनी बोरसे आणि त्यांचे साथीदार सुनील राखुंडे यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती भुसावळ शहरात वाऱ्यासारखी पसरली, काही वेळातच हजारो लोक खासगी रुग्णालयाच्या आवारात एकत्र जमले. वाढता जमाव आणि तणाव वाढत असल्याचं लक्षात घेत पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


पुण्यानंतर जळगावातही राजकीय दबाव, अपघातातील आरोपी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा; एकनाथ खडसेंचा आरोप