मुंबई: जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये (Model Code Of Conduct) शिथिलता दिली जाणार नाही अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर लोकसभा स्थापन होईल आणि त्यानंतर आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक काही घोषणा किंवा निर्णय राज्य सरकारला घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेण बंधनकारक राहणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार असा प्रश्न आता राज्य सरकारसमोर आहे.
देशात सात टप्प्यात मतदान होत असून सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून निकालानंतर आचारसंहिता हटवण्यात येईल अशी चर्चा होती. पण त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. तसेच या काळात राज्य सरकारला कोणतेही मोठे निर्णय घेता येणार नाहीत, जर काही अत्यावश्यक निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
दुष्काळग्रस्त भागाला मदत जाहीर करण्यास अडचण
देशात 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर पुढील सरकार सत्तेत येण्यासाठी किमान 15 दिवस किंवा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. जून महिना त्यामध्ये पूर्ण जाऊ शकतो. एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे तर दुसरीकडे आचारसंहिता लागू असल्याने त्यावर कोणताही महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य सरकार कशा पद्धतीने मदत करणार हे पाहावं लागेल.
देशातील लोकसभेच्या निवडणुकीचे टप्पे आणि झालेले मतदान
पहिला टप्पा
एकूण जागा - 102मतदारसंघ
एकूण मतदान - 66.14 टक्के
दुसरा टप्पा
एकूण जागा - 88 मतदारसंघ
एकूण मतदान - 66.71 टक्के
तिसरा टप्पा
एकूण जागा - 94 मतदारसंघ
एकूण मतदान - 65.68 टक्के
चौथा टप्पा
एकूण जागा - 86 मतदारसंघ
एकूण मतदान - 69.16 टक्के
पाचवा टप्पा
एकूण जागा - 49 मतदारसंघ
एकूण मतदान - 62.20 टक्के
सहावा टप्पा
एकूण जागा - 58 मतदारसंघ
एकूण मतदान - 63.37 टक्के
निवडणूक आचारसंहितेचा नियम काय सांगतो?
देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच, निवडणूक आचारसंहिता लागू होते. तर, नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणूक निकालानंतर काही दिवसांनी नवीन सरकार सत्तेत येईल.
ही बातमी वाचा :