ठाणे : बदलापूरच्या घटनेनंतर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असल्याचं दिसत आहे. भिवंडी शहरातही अशीच एक घटना समोर आली असून एका नराधमाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. रफिक शेख (वय 28) असं त्या आरोपीचं नाव असून गेल्या सहा महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचं उघडकीस आलं आहे. 


भिवंडी शहरात रफिक शेख या नराधमाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली आणि नंतर शारिरीक अत्याचार केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास बेड्या ठोकल्या आहेत.


पीडितेचे आई-वडील बाहेर गेल्यानंतर अत्याचार


शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहणाऱ्या 28 वर्षीय नराधमाने शेजारील 13 वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. नंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. पीडितेचे आई वडील कामाला गेल्यावर तिच्यावर गेल्या सहा महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले.


दरम्यान 25 ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पिडीतेने आईकडे या बाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर या नराधमाविरोधात तक्रार दिली.


गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या


या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. आरोपीला भिवंडी न्यायालयात मंगळवारी हजर केले असता 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.


गुंडाच्या त्रासाला कंटाळून अलोल्यात विद्यार्थिनीची आत्महत्येचा प्रयत्न


अकोला जिल्ह्यात एका विद्यार्थिनीने एका सडकछाप गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही विद्यार्थिनी मुर्तिजापूर तालूक्यातील माना पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. ती मुर्तिजापूर येथे शिक्षणासाठी गावावरून ये-जा करीत होती. 


दरम्यान, गावातीलच एका गुंडप्रवृत्तीच्या तरूणाने तिला धमकावत तिच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारावर तिला तो ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचाराची (Sexual Abuse) धमकी देत होता. अखेर या विद्यार्थिनीने त्याच्या धमक्यांना घाबरत 26 ऑगस्ट रोजी घरी किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 


ही बातमी वाचा :