Bhandara News भंडारा :  भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर एका तरुणीनं विनयभंगाचा आरोप लावला होता. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल भंडारा पोलीस (Bhandara Police) अधीक्षकांनी मंत्रालयात पाठविला असून डॉ. अशोक बागुल यांच्याविरुद्ध कोर्टात चार्ज शीट दाखल करण्यात आली आहे. असं असताना आरोप असलेल्या SDPO बागुल यांच्यावर कुठलीही कारवाई नं होता, त्यांना पुन्हा भंडारा इथं कालपासून सेवेत रुजू करून घेतलं आहे.


भंडाऱ्याचे SDPO डॉ. बागुल यांच्याकडं एक तरुणी पोलीस तक्रारीच्या अनुषंगानं मदतीसाठी गेली होती. यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर करण्यात आला होता. परिणामी, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 7  जूनला भंडारा पोलिसांनी बागुल यांच्या विरुद्ध 354 (अ)(2), 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. 


बागुल यांच्या विरोधात कोर्टात चार्ज शीट दाखल


या प्रकरणानंतर डॉ बागुल हे वैद्यकीय रजेवर गेले होते. तब्बल महिनाभरानंतर डॉ. बागुल काल पुन्हा भंडारा इथं रुजू झाले आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम यांनी केला. संपूर्ण चौकशीनंतर आता डॉ बागुल यांच्या विरोधात कोर्टामध्ये चार्ज शीट दाखल करण्यात आली आहे. तर, चौकशीचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. SDPO बागुल यांच्या विरोधात कोर्टात चार्ज शीट दाखल करण्यात आलेली असताना अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर, दुसरीकडं ते काल भंडारा येथे पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्यानं आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर


प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली होती. हा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara)घडला असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीसाठी गेल्यावर डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या विरोधात उशिरा भंडारा पोलिसात (Bhandara Police) भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली होती. तर आता हे प्रकरण थेट मंत्रालयात पोहचले असून आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या