Yavatmal News यवतमाळ : यवतमाळच्या पुसद येथे एक खळबळजनक घटना उघड झाली आहे. यात पुसद शहरातील सनी प्राईड लॉजमध्ये एका विवाहितेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सपना संजय मोरे असे या मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या(Murder) केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना उजेडात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास केला असता काही तासातच मारेकर्‍याला अटक करण्यात आली आहे. हे कृत्य करण्यामागे मृत महिलेचा पती संजय मोरे असून त्याला पोलिसांनी (Yavatmal Police) ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पुसद शहर पोलीस करत आहेत.


कौटुंबिक वाद विकोपाला, मारेकर्‍याला अटक


या प्रकरणातील मृत सपना मोर आणि संजय यांचा प्रेम विवाह झाला होता. मात्र, काही दिवसातच त्यांच्यात सतत वाद होत असल्याने हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन या संदर्भात पुसद न्यायालयात खटला सुरू होते. असे असताना संजय आणि सपना हे दोघेजण पुसदमध्ये सनी प्राइड लॉज मध्ये थांबले होते. त्यानंतर काही वेळाने संजय हा तेथून निघून गेला होता. तर दुसऱ्या दिवशी येथील रूमचे दार उघडत नसल्याने लॉज मालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.


पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेउन दार उघडले असता, सपना यांचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला असता तिचा गळा आवरून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यावरून पोलिसांनी संशयाची सुई मारेकरी पती संजय मोरे याच्याकडे वळवत त्याला ताब्यात घेतले. या तपासात त्यानेच हे कृत्य केल्याचे कबूल केले असून पत्नीच्याच ओढणीने गळा आवळून ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे. 


वडगाव जंगल ठाण्याचा कारभार टेंटमधून  


वादळाच्या तडाख्यात इमारतीवरील टिनाचे छप्पर उडून गेल्यामुळे वडगाव जंगल पोलिस ठाणे आता उघड्यावर आले. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार चालविण्याकरिता तात्पुरता टेन्ट उभारण्यात आला आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी बसण्याची सोय नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने ठाण्याचे छप्पर उडून गेले. संगणक आणि कागदपत्रे पावसाने ओली झाली. छप्पर उडल्याने ठाण्यात कामकाज कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये स्टेशन डायरी आणि वायरलेसची व्यवस्था करण्यात आली. तर ठाणेदारांना कामकाज सांभाळण्यासाठी समोरील मैदानात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाड गोणपाटाचा टेन्ट उभारण्यात आला आहे. ठाणेदार, ठाणे अंमलदार, वायरलेससाठी तात्पुरती सोय झाली असली तरी बिट जमादार आणि इतर कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था नाही, परिणामी पोलीस ठाणे उघड्यावर आल्याचे चित्र आहे.


इतर महत्वाच्या बातम्या