Bhandara Crime News : कौटुंबिक वाद कधी कुठल्या पातळीला जाईल हे सांगता येत नाही. अनेकदा रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटना समोर येतात. अगदी किरकोळ कारणांनी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार समोर येत असतात. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात समोर आला आहे. मुलाने वेगळं राहण्याच्या कारणावरुन आपल्या पित्याची हत्या केल्याची ही घटना आहे.
वेगळं राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुन्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे रात्रीचा सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. जानबा मेश्राम (70) असे मृत वडिलांचे नाव आहे, तर देवेंद्र मेश्राम (33) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहत असून रात्री जेवण झाल्यानंतर जानबा यांनी आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही, त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असं सांगितलं. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात त्यानं घरातून कुऱ्हाड आणली. कोणताही विचार न करता थेट जन्मदात्या वडिलांचा मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला.
हा घाव इतका वर्मी बसला की जानबा रक्त बंबाळ होत खाली पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. आरडाओरड होताच बहिण श्यामकला सहारे धावत आली असता तिलाही देवेंद्रनं मारहाण केली. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी देवेंद्र मेश्राम याला अटक करत त्याच्याविरुद्ध 302, 323 कलमानवये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या