धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
महेशने आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले.

बीड: जिल्ह्याच्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे एका 24 वर्षीय तरुणाने मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचे पाऊल उचलले. आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला डावलण्यात आल्याने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) घटनेची नोंद केली आहे.
महेशने आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. गेल्या सोमवारी 6 एप्रिल रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे तो स्वतःला सावरू शकला नाही. त्यामुळे, दरम्यान तो नैराश्येत गेला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.
हेही वाचा
Gold: सराफ व्यापाऱ्यास सोनं-चांदीची बनावट नाणी दिली, 30 लाखांना गंडा; आरोपींचा असा झाला उलगडा






















