Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
Vaibhav Chavan Suspicious Death Beed : धाराशिव पोलीस भरतीतील बोगस क्रीडा प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा इमामपूर शिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बीड : पोलीस भरतीत खेळाडू कोट्यातून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या नवगण राजुरी (जि. बीड) येथील वैभव चव्हाण (24) या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी इमामपूर शिवारात वैभवचा मृतदेह मिळून आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याच्या अंगावर आणि पायांवर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याचा दावा करत नातेवाईकांनी हा सरळसरळ घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Bogus Certificate Scam Exposed : क्रीडा आयुक्तालयातील बोगस रॅकेट चव्हाट्यावर
वैभव चव्हाण हा कराटे स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्याकडे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत प्रमाणपत्रे होती. 2024-25 च्या धाराशिव पोलीस भरतीमध्ये खेळाडू कोट्यातून त्याने अर्ज केला होता. मात्र, वेटिंग लिस्टमध्ये असताना त्याच्या पुढील उमेदवाराने बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा संशय त्याला आला.
याप्रकरणी वैभवने क्रीडा आयुक्तालय बालेवाडी (पुणे) येथे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर 'कुराश असोसिएशन'च्या अध्यक्ष, सचिवांसह अनेक जिल्हाध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले होते. पुण्यात पोलीस भरतीत लागलेल्या 19 जणांपैकी ड्युटीवर असलेल्या 9 पोलिसांना थेट जेलमध्ये जावे लागले होते.
तक्रार केल्यानंतर बोगस प्रमाणपत्र माफियांकडून आपल्या आणि मित्राच्या जीवाला धोका असल्याचे सांगणारा वैभवचा एक ऑडिओ मेसेज (Audio Clip) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
Vaibhav Chavan Suspicious Death : कमरेवर वार अन् मारहाणीच्या खुणा
गुरुवारी वैभवचा मृतदेह आढळल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मयत वैभवचे बंधू गणेश चव्हाण आणि नातेवाईकांनी आरोप केला की, वैभवच्या शरीरावर, कमरेला आणि पायांवर गंभीर मारहाणीचे डाग आहेत.
सामाजिक कार्यकर्ते हनुमंत धायगुडे आणि महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. "हा निव्वळ अपघाताचा प्रकार नसून बोगस प्रमाणपत्र माफियांकडून केलेला घातपात आहे. महाराष्ट्रात पोलीस भरतीत बोगस सर्टिफिकेट वाटणाऱ्या सर्व नराधमांवर कडक कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
Police Investigation Statement : चौकशीसाठी दोन अधिकारी तैनात
या दुर्दैवी आणि संशयास्पद घटनेबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी माहिती दिली. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव म्हणाले, "सध्या उपलब्ध झालेल्या इन्क्वेस्ट (Inquest) पंचनामा आणि प्रोव्हिजनल (Provisional) मेडिकल अहवालावरून थेट मारहाण झाल्याचे निष्पन्न होत नाही. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. वैभवचा मोबाईल डेटा डिलीट झाला असला तरी तो रिकव्हर केला जाईल. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल."
गुरुवारी रात्री उशिरा नवगण राजुरी येथे पोलीस बंदोबस्तात वैभव चव्हाण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
ही बातमी वाचा:






















