मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या आरोपी गुरुनैल सिंगला 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद झाल्यानंतर त्याचं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपींना हत्यार, वाहन कुणी दिलं? या आरोपींकडून 28 जिवंत काडतूस सापडली, ती फक्त सिद्दिकींना मारण्यासाठी होती की अजून कुणी निशाण्यावर होतं? ते कुठल्या गँगशी संबंधित आहेत? या प्रश्नांची उत्तर पोलिसांना मिळणार आहेत.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील अटकेत असलेले दोन आरोपी, धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंग यांना किला कोर्टात क्राईम ब्रांचने हजर केलं. यावेळी न्यायाधीशांसमोर या आरोपींनी आपली नावं वेगवेगळी सांगितली. तसंच न्यायाधीशांनी आरोपी धर्मराज कश्यपला वय विचारलं तेव्हा त्याने त्याचं वय 17 वर्षे असल्याचं सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून वागणूक मिळावी यासाठी, आरोपीच्या वकिलाकडून हा युक्तिवाद केल्याचं सांगण्यात येतंय. मात्र सरकारी वकिलांनी हा दावा खोडून काढला, तसंच पोलिसांनी आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणीदेखील केली. त्यानंतर न्यायालयाने एका आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिली तर दुसऱ्या आरोपीचे वय निश्चित करण्याचं पोलिसांना निर्देश दिले.
सिद्दीकी हत्या प्रकरण : कोर्टात काय घडले ?
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
- आरोपी धर्मराज कश्यपचे वय 17 वर्षांचे आहे. अल्पवयीन आरोपी म्हणून खटला चालवावा.
- वयाच्या खात्रीसाठी वैद्यकीय चाचणीस आम्ही तयार आहोत
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
- आरोपी 17 वर्षांचा नाही.आधारकार्डवर त्याचे वय 19 वर्षे.
- आरोपीच्या वकिलांकडे वयासंबंधीचे पुरावे नाहीत.
- अशा गुन्ह्यात आरोपी बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात.
- आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.
- आरोपींनी पुणे आणि मुंबईत राहून सिद्धीकींची रेकी केली.
- आरोपीना हत्यार कोणी दिलं? वाहन कोणी दिलं? ते तपासायचं आहे.
- आरोपींकडे 28 जिवंत काडतुसं मिळाली,सिद्दीकींशिवाय ती कुणासाठी होती? ते तपासायचं आहे.
- दोन आरोपी फरार आहेत, त्यांच्या शोधासाठी या दोघांची कोठडी हवी.
- आरोपी कुठल्या गँगशी संबंधित आहेत तेही शोधायचंय.
- निवडणुका तोंडावर आहेत, यांच्या निशाण्यावर अन्य कोणी होतं किंवा आहे का ते तपासायचं आहे.
- आरोपींनी मारलं ते माजी मंत्री आहेत, यांचा गुन्हा गंभीर आहे.
- आधी गुन्ह्यातील तपास पाहावा, त्यात काही मिळतयं का त्या आधारावर पुढील कस्टडी द्यावी.
- पुण्यात आरोपी काय करत होते? कोणाकडे राहत होते? ते तपासायचं आहे.
- पोलिसांची 10 पथकं शोध घेतायत, अजून काही मिळालेलं नाही.
- एखाद्या चित्रपटात असावा तसा आरोपींनी कट रचलेला आहे.
- तपासात आरोपी आपली नावं,जन्मतारीख वेगवेगळी सांगत आहेत.
ही बातमी वाचा: