Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर ) रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली, त्यानंतर दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला असून त्याचं नाव शिवानंद आहे.
आरोपी शिवानंदचं शेवटचं लोकेशन सापडलं
बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंदचं शेवटी पनवेलमध्ये दिसून आलं आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत. आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले, कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटिव्हीत आढळून आला आहे. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा सिद्दीकी हे सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्सचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
बाबा सिद्दीकींची गाडी बुलेटप्रूफ असतानाही काचेतून गोळी आत गेली
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या ठिकाणाहून सहा रिकाम्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाबा सिद्दीकींची गाडी बुलेटप्रूफ असतानाही काचेतून गोळी आत गेली. हा गुन्हा करण्यासाठी ९.९ एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या आरोपीचे नाव शिवकुमार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. या नावाची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी लवकरच नावाची पडताळणी केली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या