मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एक आरोपी धर्मराज कश्यप हा मुळचा उत्तर प्रदेशमधील असून पुण्याला भंगार गोळा करण्याच्या कामासाठी जात असल्याचं त्याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितल. धर्मराज कश्यप याच्या आईने ही माहिती दिली असून एक महिन्यापूर्वीच आरोपी पुण्याला गेला असल्याचं तिने सांगितलं. पुण्याला गेल्यापासून मुलाने आपल्याशी कोणताही संपर्क ठेवला नसल्याचं तिच्या आईने सांगितलं. 


धर्मराज कश्यप हा पुण्यात भंगार गोळा करण्याच्या कामासाठी गेला होता एवढीच मला माहिती आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली. तो मुंबईमध्ये काय करत होता त्याची माहिती नसल्याचं तिने सांगितलं. आरोपी पुण्याला गेल्यापासून त्याने आपला कॉलही उचलला नसल्याचं त्याच्या आईने सांगितलं. त्याचं वय हे 18 ते 19 वर्षे असल्याची माहितीही तिने दिली. 


 




राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी हा फरार आहे. 


आरोपी पुण्यात स्क्रॅप डीलरचं काम करायचा


बाबा सिद्दीकींना मारणारा तिसरा आरोपी शिवानंद हा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात स्क्रॅप डीलरचं काम करत असल्याची माहिती आहे. या हत्येमागे चौथा आरोपीही असल्याचा पोलिसांना संशय आहे.  


मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून सध्या फरार आरोपी शिवानंदचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. अटकेत असलेला धर्मराज आणि शिवानंद हे दोघेही, यूपीच्या बहराईचमधील गंडारा गावातील असल्याचं सांगण्यात येतंय. हे दोघेही बऱ्याच काळापासून मुंबई-पुण्यात वास्तव्यास असल्याचीही माहिती समोर आली आहे. 


आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात


फरार आरोपी शिवानंद पुण्यात स्क्रॅप डीलरचं काम करायचा. शिवानंदने काही दिवसांपूर्वी दुसरा आरोपी धर्मराजला पुण्याला बोलावले होते. बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने, गुरमैलचं शिवा आणि धर्मराजशी बोलणं करून दिलं होतं. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुरमैलवर या आधीही हत्येचा एक गुन्हा दाखल आहे. धर्मराज आणि शिवा हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात कधी आले, याची कुटुंबीयांनाही माहिती नसल्याचं सांगण्यात येतंय.


ही बातमी वाचा :