Amravati News अमरावतीअमरावतीत कार अपघात प्रकरणी (Amravati Accident) आता अमरावती शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आज रविवारच्या सकाळी एबीपी माझाने बातमी प्रसारित होताच पोलीसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान केले असून या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथक तयार करण्यात आले आहेत. सोबतच या अपघातात धडक देणाऱ्या त्या वाहनाची आणि त्यातील व्यक्तींची माहिती देणाऱ्याला 20 हजार रुपयांचे  बक्षीस देखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.


एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट


पुण्यातील हिट अँड रन कार अपघाताची घटना (Porsche Car Accident) संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली होती. यात अमरावतीच्या (Amravati News) गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मे च्या दुपारी संमती कॉलनी परिसरात एका भरधाव कार चालकाने भर दिवसा एका इसमाला जोरदार धडक दिली. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या या इसमाला तसेच सोडून कार चालकाने पळ काढला होता. हा अपघात इतका भीषण होता की यात या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना होऊन आज 23 दिवस उलटले असले तरी अद्यापही या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही.


आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर


एकीकडे राज्यात पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे समाजमन हेलावून गेलं असताना अमरावतीच्या या घटनेचेही स्मरण अमरावतीकरांना होत आहे. परिणामी, यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. अशातच एबीपी माझाने या अपघाताची बातमी आज प्रसारित केली असता, अमरावती पोलिसांच्या कारवाईला वेग आले आहे. परिणामी पोलिसांनी 4 पथके तयार करून यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. 


23 दिवसानंतरही आरोपी फरारच!


अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनाने जात होते. दरम्यान, एका भरधाव इंडिका कारने त्यांना जोरदार धडक देत उडविले. त्यानंतर या कारमधील तरुण बाहेर आले आणि परत कारमध्ये बसून निघून गेले. यावेळी त्यांनी जखमी भीमसेन यांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील तसदी न घेता घटनास्थळावरून निघून गेले. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केले.


मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा 15 मे रोजी उपचारअंती मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर या संपूर्ण घटनेची तक्रार गाडगे नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र 23 दिवसानंतरही पोलिसांनी अद्यापही या प्रकरणातील आरोपींना अटक केलेली नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये आणि शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या