Stock Market Fraud: सध्या शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शेअर बाजारातून चांगले पैसे कमवता येऊ शकतात, हे समजू लागल्यामुळे तरुण या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. पण एकीकडे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे लोकांसोबत होणाऱ्या घोटाळ्याचे प्रमाणही बरेच वाढले आहे. जास्त परतावा मिळून देतो या एका आश्वासनाला बळी पडून लोकांच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. बंगलुरु शहरात गेल्या चार महिन्यांत शेकडो लोकांना फसवण्यात आलंय. या फसवेगिरीमध्ये एकूण 200 कोटी रुपयांची लूट झाली आहे.    


चार महिन्यांत एकूण 735 तक्रारी


आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरू शहरात गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केट फ्रॉडची चर्चा आहे. शेअर बाजारात फसवले जाण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. गेल्या चार महिन्यात शहरातील लोकांना एकूण 197 कोटी रुपयांचा चुना लागला आहे.. द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अशा बंगळुरू शहराच्या साइबर क्राइम विभागाकडे गेल्या चार महिन्यांत एकूण 735 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तुमचे पैसे आम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवू आणि तुम्हाला मोठा परतावा देऊ, असे आश्वासन देत, येथे लोकांची लूट करण्यात आली आहे. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा घोटाळा थांबवण्यात बंगळुरु पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलीस आतापर्यंत फक्त 10 टक्के प्रकरणांत केवळ बँक खाते गोठवू शकले आहेत.  


प्रत्येक दिवशी फसवणुकीची आठ प्रकरणं 


मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात अशा फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. बंगळुरुमध्ये होत असलेल्या या फसवणुकीचा तपास करण्यासाठी सायबर पोलिसांनी एक वेगळे  पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये प्रत्येक दिवशी शेअर मार्केटशी संबंधित साधारण 8 तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. एकूण 237 प्रकरणात गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांना 88 कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.  


जास्त पैशांचा हव्यास लोकांना नडतोय 


बंगळुरूमध्ये होणाऱ्या फसवणुकीवर तेथील पोलीस अधिकारी चंद्रगुप्त यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. फसवणुकीला बळी पडलेले बहुसंख्या तक्रारदार हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांना शेअर मार्केटचे ज्ञान आहे. पण अतिरिक्त नफा मिळावा या एका हव्यासापोटी ते अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडत आहेत, असे चंद्रगुप्त यांनी सांगितले.  


हेही वाचा :


नवं क्रेडिट कार्ड घेताय? जाणून घ्या काय काळजी घ्यावी; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा!


सरकारच्या 'या' एका योजनेमुळे महिला होतात मालामाल, 2 वर्षांत मिळतात थेट 2.32 लाख रुपये!


500 च्या नोटांचा खच, खोलीत 26 कोटींचं घबाड; नाशकात 30 तासांच्या आयटी रेडमुळे खळबळ!