Ambernath Crime News : समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती आणि प्रबोधनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनेकजण आजही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले असल्याचे प्रकार समोर येतात. जादूटोणा करण्याच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात हा प्रकार घडला आहे.


तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ मार्च रोजी काकडवाल गावातील शंकर महादेवाच्या मंदिरात २४ वर्षीय आदेश मारके हा तरुण पूजा करत होता. मात्र तो जादूटोणा करत असल्याचा काहींना संशय होता. त्यामुळे १८ तारखेला रात्री उशिरा ३ ते ४ जणांनी मंदिरात जाऊन आदेशला शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली. 


इथे कोणताही जादूटोणा करण्याचा प्रकार नाही आम्ही पूजा करत होतो असे आदेशने गावकऱ्यांना सांगितले. मात्र त्याचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही आणि त्याला जबर मारहाण करण्यात आली.  या प्रकरणी पीडित असलेला तरुण आदेशच्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. काकडवाल गावातील काका भोईर यांनी गावकऱ्यांच्या विनंतीवरून आपल्या जागेत महादेवाचे मंदिर बांधण्यास परवानगी दिली होती. आता हे मंदिर बांधल्यानंतर गावकऱ्यांना मंदिराच्या आजूबाजूची जागा देखील पाहिजे आहे. त्यासाठी ते काका भोईरवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय या मारहाणीच्या प्रकरणानंतर भोईर याच्या घराची देखील या गावकऱ्यांनी तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha