Maharashtra Satara Bagad Yatra : महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यानं बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पण या बगाड यात्रेची परंपरा काय? ती का साजरी केली जाते? हे जाणून घेऊयात...  


सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा. सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झालेले असतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैल. या उत्सवाला सुरवात होते ती नव्याच्या पौर्णिमेपासून. बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात. हे कळक तोडण्यासाठी आख्खं गाव जमा होतं. कळकांच्या बेटाजवळ गेल्यानंतर सर्वात मोठं कळक याठिकाणी शोधलं जातं आणि ते कापून वाजत गाजत गावात आणलं जातं. त्यानंतर गावाकरी आपला मोर्चा बाभळीच्या झाडाकडे वळवतात. लाकडातील चिवट लाकूड म्हणून बाभळीच्या झाडाकडे पाहिलं जातं. या बगाडासाठी खास बाभळीची लाकडं तोडून तीही वाजत गाजत गावात आणली जातात. आणि ही बाभळीची लाकडं आणण्यासाठी गावातील एकोप्यातील जल्लोष पहायला मिळतो. 


फाल्गुन शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण गावातील भक्त मंडळींकडून गावचं मंदिर साफसफाई आणि धुण्याचं काम सुरु होतं. यालाच पाकळणी असं म्हणतात. माघाची पौर्णिमा म्हणजे, भक्तांचा उत्सव आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचं कौतुक. या दिवशी नाथांच्या भगीनी भवानी आई आणि जननी आई यांच्या मंदिरापासून काठ्या निघतात. 


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बगाड यात्रेचा आनंद लुटा 'माझा'सोबत



बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगीनिंना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे. या दिवशी नाभिक समाजाला खास महत्व दिलं जातं. मानाचं पान लाभलेला नाभिक समाज दिवटीचं टोक मनगटावर टोचून वाद्यांच्या गजरात काट्या नाचवत या दोन्ही भगिनींना मंदिरात आणतात. मंदिरात आल्यानंतर हे दिवटीच टोक बाहेर काढलं गेलं आणि बोंब ठोकून देवाच्या नावानं जयघोष केला गेला. आणि नंतर सुरु होतो तो हळदीचा कार्यक्रम. पंचक्रोषीत बारा बलुतेदार आणि मानाच्या महिला या हळदीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हळदीच्या कार्यक्रमात देवाला हळद लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतो.


प्रत्येक वर्षी गावातील लोहाराला एक वेगळा मान असतो आणि यांच्या हातून मानाचा नाल या मंदिराला ठोकला जातो. सध्या या मंदिरावर असलेल्या नालांची संख्या सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. म्हणजे तीनशे पेक्षा जास्त वर्ष या बगाडाचा उत्सव सुरु असल्याचं सांगितलं जातं. हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि याच दिवसापासून या बगाडाच्या यात्रेची सुरुवात झाली.