कोल्हापूर : कोल्हापुरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पत्र्याच्या पेटीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (20 मार्च) दुपारी ही घटना उघडकीस आली.
पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या धरणाच्या मागील बाजूला रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर बेवारस स्थितीत पडलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असावं, अशी शक्यता आहे. तसंच सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयिताने महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून मानोली लघु पाटबंघारे जलाशयाच्या परिसरात टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पत्र्याच्या पेटीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि तिथली पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.
दरम्यान ही महिला कोण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याने मृतदेह फारसा चांगल्या परिस्थितीत नाही. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बेपत्ता असणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी तसंच घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हे ही वाचा
Kolhapur: तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितला म्हणून केली हत्या, कोल्हापूरातील धक्कादायक घटना
Kolhapur Crime : भाच्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मामाचा बेदम मारहाणीत मृत्यू