Nashik News : शिवसेनेतील (Shiv Sena) विद्यमान आमदारांच्या बंडानंतर आता माजी आमदारानेही राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खदखद व्यक्त केली आहे. शिवसेनेचे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) धर्म फक्त शिवसेनेच पाळायचे का? असा सवाल त्यांनी फेसबुकवर विचारला. तसंच या पुढील माझ्या मतदारसंघातील सगळ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार, असा निर्धारही त्यांनी केला.


माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या कारभारावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याच कामात विचारात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळेच महाविकास आघाडीचे धर्म फक्त शिवसेनेने पाळायचे का असा संतप्त सवाल घोलप यांनी विचारला.



मी पक्षात राहून बोलतोय : योगेश घोलप
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना योगेश घोलप यांनी व्यक्त केली. यााबात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याआधीच खंत व्यक्त केली होती. तसंच पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे संकेत पक्षप्रमुखांनी दिल्याची माहिती घोलप यांनी दिली. तसंच शिवसेना पक्ष कधीच सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी पक्ष सोडून भूमिका मांडली, मी पक्षात राहून बोलत असल्याचा दावा त्यांनी केला 


आजी-माजी आमदारांमध्ये सुप्त संघर्ष
घोलप कुटुंबियांचे मागील 30 वर्षांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पाच वर्ष तर मागील पंचवार्षिकमध्ये पुत्र योगेश घोलप यांनी एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याकडे आता शिर्डी लोकसभेची जबाबदारी आहे. 2019 मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला. तेव्हापासूनच आजी-माजी आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरु आहे. 


योगेश घोलप यांच्या भूमिकेला फेसबुकवर समर्थन
आता फेसबुकवर पोस्ट करुन माजी आमदार योगश घोलप यांनी महाविकास आघाडीचे धर्म केवळ शिवसेनेने पाळायचे का, असा संतप्त सवाल विचारत आपल्या मतदारसंघातील सगळ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं. दरम्यान योगेश घोलप यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचे फेसबुकवर समर्थन मिळत आहे.