अकोला : शेगावातील  पोलीस कोठडीत या सराफा व्यवसायिकावर अनैसर्गिक अमानुष मारहाण आणि लैंगिक अत्याचाराप्रकरणी  अकोला स्थानिक गुन्हे शाखेतील आज एकाच दिवशी तब्बल पाच जणांना निलंबित करण्यात आलंय. यामध्ये एका सहायक पोलीस निरिक्षकांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


सोनेचोरी प्रकरणात चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप शेगाव येथील एका  सराफा व्यावसायिकावर होता. यात अटकेत असलेल्या सराफाने पोलीस कोठडीत त्याला अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ झाल्याचा आरोप अकोला पोलिसांवर केला होता. यात सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस शिपाई शक्ती कांबळेवर हे प्रमुख आरोप होते. याप्रकरणी अकोला शहर पोलीस अधिक्षक आणि बुलढाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात दोन चौकशी समित्या गठीत करण्यात आल्या. या दोन्ही समित्यांचा अहवाल उद्या मिळण्याची शक्यता आहे. त्याआधीच शेगावात आरोपी सराफावर अटकेची कारवाई करणाऱ्या संपूर्ण टिमचं निलंबित करण्यात आलीय. 


आज निलंबित झालेल्या लोकांमध्ये पथक प्रमुख नितीन चव्हाण यांच्यासह विरेंद्र लाड, मॉन्टी यादव, काटकर आणि चालक पवार या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आधीच पोलीस शिपाई शक्ती कांबळेचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या सहावर गेली आहे. हे संपुर्ण प्रकरण 'एबीपी माझा'नं उचलून धरलं होतं. 


काय आहे नेमके प्रकरण?


 9 जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला सोने चोरी प्रकरणात अटक केली होती. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी शेगावात अटकेची कारवाई केली होती. चोरीचे सोने खरेदी प्रकरणातील या संशयित शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला रात्री 3 वाजता शेगावातून अटक करण्यात आली होती. मात्र, ही अटक, त्यानंतरची त्याची पोलीस कोठडी, पोलीस कोठडीतील त्याच्यासोबत झालेल्या अमानुषततेचा आरोप यामुळे अकोला स्थानिक गुन्हे शाखा पार अडचणीत सापडली आहे.  शेगावातून अकोल्यात आणतांना आरोपी सराफाला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यासोबतच तोंडावर आणि अंगावर हे दोन पोलीस कर्मचारी थुंकल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. रविवारी आरोपी सराफाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत आरोपी सराफाला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीत करण्यात आलेले अत्याचाराचे आरोप अक्षरश: अंगावर काटा आणणारे आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha