अकोला : बातमी आहेय अक्षरश: अंगावर काटा आणणारी.... प्रकरण आहेय अकोला पोलिसांवर झालेल्या अमानुष वागणुकीच्या आरोपांचं... अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सोने चोरी प्रकरणात शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला अटक केली होती. पोलीस कोठडीत या सराफा व्यवसायिकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि उकळत्या पाण्यानं त्याचा पाय जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाआहे. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस शिपाई शक्ती कांबळे यांच्यावर या अमानुष 'थर्ड डिग्री'चा आरोप जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. आरोप करण्यात आलेला पोलीस अधिकारी आणि शिपायावर अद्यापपर्यंत कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, आरोप झालेल्या दोघांचीही तडकाफडकी स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक्षकांकडे चौकशी देण्यात आली आहे. 


काय आहे नेमके प्रकरण?


 9 जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला सोने चोरी प्रकरणात अटक केली होती. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी शेगावात अटकेची कारवाई केली होती. चोरीचे सोने खरेदी प्रकरणातील या संशयित शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला रात्री 3 वाजता शेगावातून अटक करण्यात आली होती. मात्र, ही अटक, त्यानंतरची त्याची पोलीस कोठडी, पोलीस कोठडीतील त्याच्यासोबत झालेल्या अमानुषततेचा आरोप यामुळे अकोला स्थानिक गुन्हे शाखा पार अडचणीत सापडली आहे.  शेगावातून अकोल्यात आणतांना आरोपी सराफाला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यासोबतच तोंडावर आणि अंगावर हे दोन पोलीस कर्मचारी थुंकल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. रविवारी आरोपी सराफाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत आरोपी सराफाला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीत करण्यात आलेले अत्याचाराचे आरोप अक्षरश: अंगावर काटा आणणारे आहेत. 


पोलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, पायावर उकळतं पाणी टाकल्याचा आरोप


पोलीस कोठडीत आरोपी सराफाला अमानुषपणे मारहाण झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 'थर्ड डिग्री' वापरतांना चव्हाण आणि शक्ती कांबळेंनी अक्षरश: सर्व मर्यादा ओलांडल्यात. सोने चोरीच्या प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या दोन आरोपींना सराफा व्यावसायिकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास या दोघांनी भाग पाडल्याचा गंभीर आरोप पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. गरम पाण्याने व्रण मिटावेत म्हणून सराफाच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलं. यामूळे त्यांचा पाय गंभीररित्या भाजल्या गेला आहे. आपली चूक झाकण्यासाठी पोलिसांनी त्यांना घरीच पाणी सांडलं हे सांगण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी तोंड उघडलं तर एनकाऊंटर करण्याची धमकी पोलिसांनी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पायाला गंभीर दुखापत झालेल्या सराफा व्यावसायिकाच्या भाजलेल्या पायावर अकोल्याच्या एका खाजगी रूग्णालयात बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर अकोल्यातच उपचार सुरू आहे. 


 पिडीत सराफानं अकोला पोलिसांवर केलेले आरोप 



  •  अटक केल्यानंतर शेगावतील घरी कुटुंबियांना अश्लिल शिवीगाळ

  •  गाडीत अमानुष मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा आरोप

  • सोने चोरीतील इतर दोन आरोपींना अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचा एपीआय चव्हाण आणि कान्स्टेबल कांबळेवर आरोप

  • मारल्याने पाय सुजल्यामूळे पायावर उकळतं पाणी टाकल्यानं पाय जळाल्याचा आरोप

  •  कोर्टासमोर मारहाण झाल्याचं न सांगण्यासाठी दबाव. जबाबाच्या को-या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप. 



आरोप झालेल्या दोघांनाही केलं पोलीस मुख्यालयात अटॅच 


 मंगळवारी जामिन मिळालेल्या  पिडीतानं झालेल्या संपुर्ण प्रकाराची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. प्रकरणाचं गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस शिपाई शक्ती कांबळे यांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. याप्रकरणाची चौकशी शहर पोलीस उपाधिक्षक सुभाष दुधगांवकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसांत अहवालानंतर संबंधितांवर कारवाई आणि गुन्हे नोंदविण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी पिडीत सराफाने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार दाखल केली आहे. 


पिडीताचे कुटुंबिय घटनेनंतर धास्तावले :


 या प्रकारानंतर पिडीत सराफाचे कुटूंबिय पार हादरून गेले आहे. पिडीत व्यक्तीचे  वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुले यांनी रात्री अटक होतांना घरात पोलिसांची भाषा आणि पद्धत यामूळे त्यांच्या मनात धास्ती बसली आहे. यासोबतच पिडीत सराफा व्यावसायिकाने या संपुर्ण घटनांनी मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचं जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.  स्वत:ला कायद्याचे रक्षक समजणा-या अकोला पोलिसांनी या प्रकरणात स्वत:च कायदा हातात घेतला आहे. या संपुर्ण प्रकरणात 'दुध का दुध, पाणी का पाणी' करणारी निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं अहे. यासोबतच अमानुषतेचा कळस खरंच गाठला गेला असेल तर या प्रकरणात दोषींना धडा शिकवणारी कारवाई करण्यासाठी राज्याचा गृहविभाग पुढाकार घेईल काय?, हाच प्रश्न यात उपस्थित होत आहे. 


इतर बातम्या : 
Mumbai School : मुंबईत सोमवारपासून नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार शाळा
Mumbai Local Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे 2 मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू, मध्य रेल्वेची माहिती
Mumbai–Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन दररोज दहा हजारापेक्षा जास्त वाहने टोल न देता करतात प्रवास, माहिती आयुक्तांच्या आदेशावरुन प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत MSRDC चा दावा