आकोला : तुम्ही 'फेसबुक'वर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारत असाल तर सावधान! अकोल्यात फेसबुकच्या माध्यमातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 56 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात अकोला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी अकोला पोलिसांनी हॅरिसन इंगोला या नायजेरियन नागरिकाला मूंबईतून अटक केली आहे. तो नायजेरियातील डेल्टा सिटी येथील नागरिक असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या एका आरोपीला बंगळुरुमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अकोला सायबर पोलिसांनी यात देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
अकोल्यातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फेसबुक मैत्री चांगलीच महागात पडली आहे. शहरातील लहरियानगर भागातील आत्माराम शिंदे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फेसबुकवरून 'रॅपगस्ट सुजी' या कथित व्यक्तीशी मैत्री झाली होती. त्याच्याशी संपर्क वाढविल्यानंतर त्याला एक गिफ्ट पाठविल्याचं सांगण्यात आलं. ते सोडून घेण्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 56 लाख उकळण्यात आलेत. आत्माराम शिंदे यांनी त्यांच्या कमाईतून विकत घेतलेले तीन प्लॉट यासाठी विकलेत. त्यातून आलेली रक्कम त्यांनी एकापाठोपाठ 22 वेळा वेगवेगळ्या खात्यात पाठवली. एकूण 56 लाख 60 हजार 998 रुपये रक्कम ऐवढी मोठी रक्कम त्यांनी पाठवली आहे. शेवटी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस तक्रार केली. यात हॅरिसन इंगोला या नायजेरियन नागरिकाच्या अटकेनंतर एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट अकोला पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
अशी झाली फसवणूक
'फेसबुक', 'ट्विटर', 'इन्स्टाग्राम', 'व्हाट्सअप' हे सध्याच्या 'टेक्नोसॅव्ही' लोकांच्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेले परवलीचे शब्द. 'सोशल मीडिया' अलिकडे समाजाचा आवाज अन आरसा झाला आहे. मात्र, याच 'सोशल मीडिया'च्या गैरवापराच्या अलिकडच्या अनेक घटनांनी या आरशालाच तडे जावू लागले आहेत. घटना आहे अकोल्यातील. शहरातील एका 68 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या आयुष्याची पुंजीच 'फेसबुक'च्या एका 'फ्रेड रिक्वेस्ट'नं हिरावून घेतली आहे. 'रॅपगस्ट सुजी' नावाच्या या कथित 'फेसबुक फ्रेंड'नं आत्माराम यांना आयुष्यभराची अद्दल घडविली. मैत्री, चॅटींग, लोभ अन नंतर फसवणूक असा हा प्रवास ही माध्यम वापरतांना तुमच्यासमोर असलेल्या धोक्यांची दाहकता सांगणारा आहे.
आत्माराम रामभाऊ शिंदे, वय वर्ष 68. आत्माराम शिंदे अकोला शहरातील कौलखेड भागातल्या लहरिया नगरमध्ये राहणारे. ते आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचं 'टेक्नोसॅव्ही' असणं पार त्यांच्या अंगाशी आलं आहे. 7 मे 2021 रोजी त्यांच्या फेसबूकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्याशी एका व्यक्तीने संभाषण केले. त्याने आपण अमेरिकन सैनिक असून सध्या सिरीया बॉर्डरवर कर्तव्यावर असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, सिरियामध्ये काम करीत असताना त्याला एक बॉक्स सापडला. त्यामध्ये अमेरिकन डॉलर आहे. ते तिघांनी वाटून घेतले. यातून आपल्या हिश्यावर 3.5. मिलीयन डॉलर म्हणजे भारतीय चलनात 25 कोटी रुपये एवढी रक्कम आली आहे. आता ती रक्कम अमेरिकेत घेवून जावू शकत नाही. त्यामुळे त्या रकमेचे पार्सल तुमच्या नावावर इंडियात पाठवतो असं त्या व्यक्तीने आत्माराम यांना सांगितलं. त्यामधील तुम्हाला तीस टक्के रक्कम तुम्हाला देईल अन बाकीची आपण घेवून जाईल, असं सांगितलं.
त्यानंतर त्याने विश्वास देवून आत्माराम शिंदे यांना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ई-मेल, जवळील एअरपोर्ट याबाबत सविस्तर माहिती मागितली. त्याने मागितलेली सर्व माहिती शिंदे यांनी त्याला दिली. त्यानंतर त्याने सांगितले की, एँन्थोनी नावाचा एजन्ट भारतात येणार आहे. तो दिल्ली विमानतळावरून नागपूर येथे 'तो' बॉक्स घेवून येणार आहे. तो तुम्हाला फोन करेल. त्याने सांगितल्यानुसार काम करा असेही सांगितले.
...अन पैसे लुटीला झाली सुरुवात
त्यानंतर 12 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता शिंदे यांना अशोक नावाच्या व्यक्तीचा शिंदे यांना फोन आला. त्याने दिल्ली विमानतळावरून बोलतो असे सांगून अँन्थोनी आलेला आहे. त्याला मराठी व हिंदी बोलता येत नाही. मी पुण्याचा आहे, असे मराठीत संभाषण केले. तुमचे पार्सल आलेले आहे. त्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगून सुरुवातीला 74 हजार 999 रुपये लागतील असे म्हटले. त्याप्रमाणे शिंदे यांनी पैसे पाठवले.
यानंतर वारंवार तब्बल 22 वेळा शिंदे यांनी पैसे पाठवले. अशी एकूण 56 लाख 60 हजार 998 रुपये रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतरही पैशाची मागणी सुरुच असल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत या सायबर दरोडेखोरांनी त्यांचं जवळपास सारं 'बँक बॅलन्स' लुटलं होतं.
पैसे देण्यासाठी विकली मालमत्ता अन प्लॉट्स
आत्माराम शिंदे हे संपूर्णपणे या टोळीच्या कचाट्यात सापडले होते. त्यांनी अधिक पैशांच्या लोभापायी आपल्या आयुष्यभराच्या मिळकतीतून मिळवलेली संपत्तीही विकायला काढली. यात आत्माराम शिंदेंनी त्यांच्या कमाईतून विकत घेतलेले तीन प्लॉट विकले. त्यातून आलेली रक्कम त्यांनी एकापाठोपाठ सांगितलेल्या खात्यांत वारंवार वळती केली. हे सारं करीत असतांना त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना पुर्णपणे अंधारात ठेवले होते.
... अन 35 लाख वाचलेत
शिंदे यांनी 56 लाख 60 हजार 998 रुपये रक्कम त्यात भरल्यानंतरही त्यांना सांगण्यात आलेली रक्कम मिळत नव्हती. या चोरट्यांनी त्यांना आणखी 35 लाख त्या खात्यांत भरायला सांगितलं होतं. ते ही रक्कमही भरायला तयार झाले होते. नेमकं याचवेळी त्यांचे मुंबईला असलेले कुटुंबिय अकोल्यात घरी परतले होते. त्यांनी हा सारा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर आत्माराम शिंदेंना आपली चूक उमगली. अन ते पुढच्या टप्प्यात भरणार असलेले 35 लाख रूपये वाचलेत.
फसवणुकीत सहभागी आहे आंतरराष्ट्रीय 'रॅकेट'
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट खदान पोलिस स्टेशन गाठलं. खदान पोलिसांनी हा तपास अकोला सायबर पोलिसांकडे सोपवला. अन अकोला सायबर पोलिसांनी आपलं सारं कसब पणाला लावत या प्रकरणातील धागेदोरे शोधायला सुरूवात केली. यात आतापर्यंत अकोला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हॅरिसन इंगोला या नायजेरियन नागरिकाला मुंबईतून अटक केली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीला बंगळुरुमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अकोला सायबर पोलिसांनी यात देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यात फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा रॅपगस्ट सुजी, रिधी गुप्ता (रा. आनंदापूर ,कोलकाता), आशिष कुमार (कॅनरा बँक, नवी दिल्ली), नसीमुद्दीन (रा. राजाजीनगर, बंगरळुरु), सिबानू कायपेंग (रा. पेरांबूर, केरळ), इम्रान हुसेन (रा. बंगळुरु), सोबीनोय चकमा (रा. जमनानगर, गुजरात), रमलज्योती चकमा (रा. एमजी रोड, बंगळुरु), अशोक (रा. दिल्ली), अँथनी (रा. सिरिया) यांचा समावेश आहे.
शिंदे यांच्या या फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे नायजेरिया, सिरिया या देशांसह भारतातील दिल्ली, बंगळुरु, मुंबई, गुजरात अन केरळ या ठिकाणी जुळलेले आहेत. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करीत एक मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. अकोला सायबर पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत या प्रकरणाची पाळंमूळं शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
कशी टाळता येईल 'ऑनलाईन' फसवणूक
तुम्ही फेसबुक, वाट्सअप, गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाईन पैसे जमा करण्याचे अॅप वापरात असाल तर सावध रहा. कारण, तुम्ही कधीही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकू शकता. तुम्ही वाट्सअप वापरत असाल तर आपल्या अकाऊंटचं 'सेटिंग्ज'मध्ये जात 'टू स्टेप व्हिरीफिकेशन' करणं अतिशय आवश्यक आहे. यासोबतच तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही खालील गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं पाहिजे.
1) मोबाईल संबंधित सर्व गॅझेट्स वापरतांना आपल्याला यातील संभाव्य धोके, सायबर गुन्हे आणि यासंदर्भातील कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे.
2) फेसबुक वापरतांना 'सेटींग्ज'मध्ये जावून 'टू फॅक्टर ऑथेंटिकेशन' आणि 'प्रोफाईल व्हेरीफिकेशन' करणं अंत्यत आवश्यक आहे.
3) यासोबतच 'सेटींग्ज'मध्ये जावून आपलं प्रोफाईल लॉक केलं तर आपलं अकाऊंट फक्त आपल्या मित्र यादीतील लोकांनाच पाहता येतं. अनोळखी लोकांना ते पाहता येणार नाही.
4) आपला युजर पासवर्ड हा वारंवार बदलत राहिले पाहिजे.
5) अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.
नव्या युगाच्या संवादाचे माध्यम म्हणून 'फेसबुक' आणि व्हाट्सअप हाताळतांना तरुणाईने त्याची दुसरी बाजू लक्षात घेत सतर्क राहणे गरजेचे झाले आहेय. सोशल मीडिया हा दुधारी तलवारीसारखा आहे. त्याचे जेव्हढे फायदे आहेत, तेव्हढेच त्याचे तोटेही असल्याचे या घटना लक्षात आणून देतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरतांना तुम्ही चौकस असणं फारच आवश्यक आहे. तरच या घटना टाळता येतील.
महत्वाच्या बातम्या :
- Cyber Crime : कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक
- बिहारमध्ये सुरु होता जीवनावश्यक वस्तूंचा 'जामतारा' कॉलसेंटर, खोटी जाहिरात करुन करत होते फसवणूक
- Online Gaming Fraud : ऑनलाईन गेमिंग व्यवसायाच्या नावावर शेकडो गुंतवणूकदारांना गंडा; नागपुरातील धक्कादायक प्रकार