Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
Ahilyanagar Matoshree Old Age Home Crime : अहिल्यानगरमधील 'मातोश्री' वृद्धाश्रमात एका वृद्धाने झोपेत असलेल्या सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले.

अहिल्यानगर : शहराजवळील विळद घाट परिसरातील प्रसिद्ध 'मातोश्री' वृद्धाश्रमात अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी आणि आधारासाठी असलेल्या या वृद्धाश्रमातच एका वृद्धाने आपल्या सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने रानटी हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 6 वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत.
मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेला आरोपी राजू घुले याने पहाटे 6 च्या सुमारास झोपेत असलेल्या सहकाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण वृद्धाश्रमात रक्ताचा सडा पसरला होता. घटनेची माहिती मिळताच एमआईडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Ahilyanagar Crime Detail : चिडवल्याच्या रागातून झोपेतच डोक्यात रॉड घातला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू घुले याचा उजवा हात सतत थरथरत होता. याच कारणावरून वृद्धाश्रमातील इतर सहकारी त्याला नेहमी चिडवत असत. याचाच तीव्र राग मनात धरून आरोपीने पहाटे 6 वाजता सर्वजण झोपेत असताना लोखंडी रॉडने डोक्यात आणि पायावर जोरदार वार केले.
या प्राणघातक हल्ल्यात मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके या दोन वृद्धांचा मृत्यू झाला. तर गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके आणि संतोष पिरगल हे 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
Police Investigation : बहिणीकडे जाण्याआधीच हल्ला केला
वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून, अहिल्यानगरच्या एमआईडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू घुले हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (कुंभारी) येथील रहिवासी आहे. तो अविवाहित असून त्याचे भाचे प्रयाग सानप यांनी त्याला 3 नोव्हेंबर 2025 रोजी मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले होते. विशेष म्हणजे, आरोपीची वृद्धाश्रमातून त्याच्या बहिणीकडे रवानगी होणार होती आणि त्याची बहीण त्याला घेण्यासाठी नाशिकहून नगरकडे येत होती.
परंतु, बहीण पोहोचण्यापूर्वीच आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलून दोन सहकाऱ्यांचा जीव घेतला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली लोखंडी रॉड हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO






















