Mumbai: मुंबईत दरोडेखोरानं दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या (Samta Nagar Police Station) हद्दीत काल (14 डिसेंबर) घडलीय. दरोडेखोरानं पश्चिम द्रुतगती महामार्गावर व्यापाऱ्याची कार अडवून त्याच्याकडून 35 लाख लुटले. दरोडा टाकल्यानंतर आरोपींपैकी एक मालाडच्या दिशेने तर, दुसरा कांदिवलीच्या दिशेने पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह डीसीपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.


मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गुजर असं व्यापाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, संदीप हे काल सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमधून मालाडकडे निघाले होते. मात्र, टाईम्स ऑफ इंडिया ब्रीज समोरून त्यांची कार मीरा रोडच्या दिशेनं निघाली असता दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वरांनी त्यांना अडवलं. तसेच अपघात झाल्याचं सांगून त्यांची कार थांबवली. व्यापाऱ्यानं कार थांबवली असता एका व्यक्तीन संदीपची कॉलर पकडली आणि त्यांना खेचून कारमधून बाहेर काढलं. तर, कारच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनं कारची काच फोडली. तसेच कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत 35 लाख रुपये होतो, अशी माहिती व्यापाऱ्यानं पोलिसांना दिलीय. 


या घटनेनंतर व्यापाऱ्यानं ही माहिती पोलीस नियंत्रणाला दिलीय. समता नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करीत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha