नागपूर : 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची तिनेच दिलेली तक्रार खोटी निघाली आहे. यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. या न घडलेल्या गुन्ह्याच्या तपासात नागपूर पोलीस दलातील सुमारे एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जोरदार दमछाक झाली. मात्र जेव्हा पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तरुणीने तिच्यावरील सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार का दिली याचा सत्य समोर आला तेव्हा सर्वजणच हादरले.


सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एका 19 वर्षीय तरुणीने कळमना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिचा रामदास पेठ परिसरातून काही आरोपींनी पांढऱ्या मारुती ओमनी व्हॅनने अपहरण केले, आणि नंतर कळमना परिसरातील चिखली मैदान या परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. या तक्रारीनंतर नागपूर शहरातील संपूर्ण पोलिस दलात खळबळ माजली. विविध पोलिस स्टेशनमधील 40 पथकं आरोपींच्या शोध कामात लागले होते. पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक आणि अनेक अधिकाऱ्यांसह सह सुमारे 1000 पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध कामात लागले.


नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''पोलिसांनी सुमारे 100 परिसरात शेकडो सीसीटीव्ही फुटेज ही तपासले. त्यानंतर तक्रार करणाऱ्या तरुणीचा रामदास पेठ परिसरातील कुठल्याच ठिकाणावरून अपहरण झालेला नाही आणि ती स्वतःच तिने सीताबर्डी परिसरातून तिने सांगितलेल्या घटनास्थळापर्यंत दोन वेगवेगळ्या ऑटोने प्रवास केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. एवढेच नाही तर तिने तिच्या तक्रारीत सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. मात्र बलात्कार झालेले सांगितलेल्या घटनास्थळापासून कळमना परिसरात पोलीस स्टेशन स्वतः एकट्यानेच गाठल्याचे ही सीसीटीव्ही फुटेजच्या पोलिसांच्या हाती लागले.''


अमितेश कुमार यांनी पुढे सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आधी सिताबर्डी आणि नंतर कळमना परिसरात एकटीच घुटमळणारी तरुणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्काराची तक्रार का देते आहे असा प्रश्न पोलिसांना ही पडला. काही महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिची विश्वासाने चौकशी केली, तिला धीर दिला आणि त्यानंतर या घटनेमागेचा अत्यंत धक्कादायक पैलू समोर आला. पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीप्रमाणे, संबंधित तरुणी एका दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम करत होती. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. दोघांना लग्न करायचे होते. या नात्याला तरुणाच्या घरातून संमती होती. मात्र, तरुणीच्या घरातून या लग्नाला विरोध होता. आपले आई-वडील काही केल्याने त्या तरुणासोबत आपला लग्न लावून देणार नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणीने खास योजना आखली..


पोलिस तपासानुसार, तरुणीची योजना होती की जर तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे गेली आणि गुन्हा दाखल झाला तर कोणताही तरुण तिच्यासोबत लग्न करणार नाही. त्यामुळे नाईलाजाने तिच्या आई-वडिलांना तिचं प्रेम असलेल्या दुसऱ्या जातीच्या तरूणासोबत लग्न लावून द्यावं लागेल म्हणजेच बदनाम होऊन आपलं प्रेम मिळवण्याची तिची योजना होती. 


आता पोलिसांनी आता संबंधित तरुणीची काऊंसलिंग सुरु केली असून तिने खोटी तक्रार दिल्याचे कबूल केले आहे. गरज भासल्यास तरुण आणि तरुणीच्या कुटुंबांना समजूतही घातली जाणार आहे. दरम्यान, प्रेमात वेडी झालेल्या तरुणीने आपलं प्रेम मिळवण्यासाठी केलेली खोटी तक्रार नागपूर पोलिसांची चांगलीच दमछाक करणारी ठरली.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha