Anil Deshmukh  Sachin Waze 100 Crore Extortion Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची खंडणी मागितली असल्याच्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे. अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे वाझेने म्हटले. चांदीवाल आयोगासमोर आज वाझेचा जबाब नोंदवला. 


मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप लावले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप या पत्रात होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना या खंडणीच्या आरोपात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची नेमणूक केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीपासून 100 कोटीच्या खंडणीचे आरोप फेटाळून लावले होते. 


निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने आज चांदिवाल आयोगासमोर जबाब नोंदवला. अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली. यावेळी सचिन वाझेने अनिल देशमुख अथवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असे म्हटले. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले. आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली आहे. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha