मुंबई : शेअर बाजार (Share Market) हे असे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रात एखादी व्यक्ती क्षणात कोट्यधीश होते. तर याच शेअर बाजारात एखाद्या गुंतवणूकदाराचे क्षणात मोठे नुकसान होते. शेअर बाजारातून भरपूर सारे पैसे कमवता येतात. म्हणूनच या क्षेत्रात फसवणुकीचेही मोठे प्रकार समोर येतात. सध्या अशाच प्रकारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची सगळीकडे चर्चा होत आहे. या पिग बुचरिंग स्कॅमच्या (Pig Butchering Scam) मदतीने लोकांना लुबाडले जात आहे.  


पिक बुचरिंग स्कॅम म्हणजे काय? 


पिग बुचरिंग स्कॅम या नावातच या फसवणुकीचा अर्थ दडलेला आहे. एखाद्या डुकराला कापण्याआधी भरपूर सारे अन्न खायला दिले जाते. त्यानंतर त्याला कापले जाते. अशाच पद्धतीने शेअर बाजारात एखाद्या गुंतवणूकदाराला अगोदर भरपूर सारे रिटर्न्स देऊन नंतर योग्य वेळी त्याच्या बँकेतील सगळे पैसे लुटले जातात. यालाच पिग बुचरिंग स्कॅम म्हटले जाते.  


हा स्कॅम कसा केला जातो? 


पिग बुचरिंग स्कॅममध्ये भल्याभल्या गुंतवणूकदारांना मोठ्या शिताफीने फसवले जाते. अगोदर गुंतवणूकदारांना तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून चांगले रिटर्न्स मिळवून देऊ, असे आश्वासन दिले जाते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला जातो. काही काळ या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्सदेखील दिले जातात. बँक खात्यात येत असलेल्या पैशांमुळे गुंतवणूकदारांचा संबंधित स्कॅमर्सवर विश्वास बसतो. परिणामी ते आणखी पैसे गुंतवण्यास तयार होतात. शेवटी स्कॅमर्स योग्य वेळ साधून गुंतवणूकदारांचे संपूर्ण बँक खाते खाली करतात. अशा प्रकारे हा स्कॅम केला जातो.  


डार्क वेबवर मिळतात लोकांचे नंबर


अशा प्रकारचा स्कॅम करणारे हे लोक काही साधेसुधे नाहीत. त्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान असते. डार्क वेबवरून ते शेअर बाजाराविषयी उत्सुकता असणाऱ्या लोकांचा नंबर शोधतात. असे नंबर ते डार्क वेबच्या मदतीने ते खरेदी करतात. त्यानंतर तुम्हाला अनोळख्या मोबाईल क्रमांकावरून एक मेसेज पाठवला जातो. तसेच तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रॅमच्या चॅनेलवर, ग्रुपवर अॅड केले जाते. या ग्रुप्सवर तुम्हाला शेअर बाजार शिकण्यासाठी काही पुस्तके पाठवली जातात. तसेच आम्ही लोकांना भरपूर सारे रिटर्न्स देत आहोत, हे सांगण्यासाठी लोकांनी कथिपणे कमवलेल्या पैशांचे स्क्रीनशॉट्स पाठवले जातात. आम्ही फार प्रामाणिकपणे लोकांचे पैसे शेअर बाजारात गुंतवतो आणि त्यांना चांगले रिटर्न्स मिळवून देतो, असे भासवले जाते. परिणामी अनेक गुंतवणूकदार याला बळी पडतात. अशा ग्रुप्सवर काही कथित ट्रेडिंग गुरुदेखील असतात. ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुमचा विश्वास बसतो आणि तुम्हीदेखील त्यांना गुंतवणुकीसाठी पैसे पाठवायला लागता. अशा प्रकारे तुमची फसवणूक केली जाते.


अशा प्रकारचा स्कॅम करताना स्कॅमर्स गुंतवणूकदारांसमोर खोटे चित्र उभे करतात. एखाद्या मोठ्या ब्रोकरेज फर्मप्रमाणे आमच्याकडे सामान आहे. आम्ही मोठ्या ब्रोकरेज फर्मप्रमाणेच काम करतो, असे भासवले जाते. त्यासाठी मोबाईल अॅप, संकेतस्थळाचीही निर्मिती केली जाते. आणि योग्य वेळ येताच गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन हे स्कॅमर्स गायब होतात. 


दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच संशयास्पद मेसेज दिसल्यावर तो ब्लॉक करावा.


हेही वाचा :


मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?


पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?


SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!


रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?


श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!