मुंबई : सध्या सोने हा मौल्यवान धातू चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भाव काही दिवसांपासून सारखा वाढत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारल्यामुळे (Gold Rate) सोने खरेदीदारांची डोकेदुखी वाढली आहे. काही लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. आता खरेदी केलेल्या सोन्याची भविष्यात चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा या लोकांना असते. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास सोन्याचा दर हा सातत्याने वाढल्याचेच दिसते. त्यामुळे हेच सोने संपत्ती संचयाचेही एक साधन आहे. पण याच सोन्याला तारण (Gold Loan) ठेवून कर्जदेखील घेऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सोने तारण ठेवून कर्ज काढणे योग्य आहे का? तारण ठेवलेले सोने सुरक्षित राहण्याची हमी असते का? आरबीआयचा त्यासाठीचा नियम काय आहे, हे जाणून घेऊ या.. 


सोने तारण ठेवून कर्ज घेता येते


आर्थिक विवंचनेत असताना आपण वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गोळा करतो. मित्रांना पैसे मागणे, खासगी कर्ज काढणे, घर गहाण ठेवणे असे वेगवेगळे मार्ग आपण अवलंबतो. मात्र सोने तारण ठेवून आपल्याला पैसे मिळू शकतात. सोने तारण ठेवून पैसे घेणे हा मार्ग इतर मार्गांपापेक्षा सोपा आणि सोइस्कर ठरतो. कारण आपल्याकडे असलेले सोने ही आपली संपत्ती आहे. आपण आपलीच संपत्ती तारण ठेवून कर्ज घेतो, सोने तारण ठेवल्यामुळे आपण घेतलेल्या कर्जाची ती एका प्रकारची हमीच असते. 


सोने तारण ठेवून कर्ज घेणे सोईस्कर


सोने तारण ठेवून कर्जरुपी घेतलेल्या पैशांना कमी व्याज असते. पर्सनल लोन, होम लोन यांच्या तुलनेत सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर कमी असतो. हे कर्ज आपल्या सोईनुसार फेडताही येते. त्यामुळे सोने गहाण ठेवून कर्ज घेणे तुलनने सोपे आणि सोईस्कर ठरते. 


सोने तारण ठेवण्यासाठीचे नियम काय? 


नियमानुसार १८ आणि त्याहून अधिक कॅरेटचे सोने असेल तेव्हाच गोल्ड लोन दिले जाते. सोने कशा प्रतीचे आहे, ते किती कॅरेटचे आहे याचा अभ्यास बँक, वित्तीय संस्था करतात आणि त्यानुसार किती कर्ज द्यायचे हे ठरवले जाते. सोन्याचे जेवढे मूल्य होईल, त्याच्या ७५ टक्केच रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. आरबीआयचा तसा नियम आहे. 


सोने तारण ठेवण्यासाठी कागदपत्रे काय लागतात? 


सोने तारण ठेवून एका दिवसात कर्ज मिळू शकते. त्यासाठीची प्रक्रियादेखील फार किचकट नाही. त्यासाठी तुमचे ओळखपत्र, सोन्याचा मालकीहक्क सांगणारे कागदपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात. विशेष म्हणजे सोने तारण ठेवून कर्ज घेताना तुमच्या क्रेडिट स्कोअरचा विचार केला जात नाही. तुमचे उत्पन्न काय आहे हेदेखील तपासले जात नाही. पर्सनल लोन देताना तुमचे उत्पन्न काय आहे, तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे, या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. तशी डोकेदुखी सोने तारण ठेवताना नसते. 


सोने तारण ठेवणे कितपत सुरक्षित? 


सोने तारण ठेवून कर्ज काढणे सुरक्षित मानले जाते. आपण तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची संबंधित संस्थेला काळजी घ्यावी लागते. काही अघटीत घडल्यास नियम आणि अटींच्या अधीन राहून आपण ठेवलेल्या सोन्याची किंमत संबंधित संस्थेला परत करावी लागते. सोने तारण ठेवून कर्ज घेण्याची प्रक्रिया किचकट नाही. मात्र ही प्रकिया पार पाडण्यासाठी, कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँका वेगवेगळी फी आकारतात. त्यामुळे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. 


हेही वाचा >>


ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह', 'या' कंपनीच्या नव्या धोरणाची चर्चा!


सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!


पुढचा आठवडा तुम्हाला करू शकतो मालामाल, 'हे' तीन IPO होणार खुले!