मुंबई : नवे आर्थिक वर्ष (New Financial Year) नुकतेच चालू झाले आहे. या वर्षात शेअर बाजार (Share Market), म्युच्युअल फंड्स (Mutual Fund) यांच्या माध्यमातून चांगली कमाई होईल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. चालू वर्षात आयपीओच्या (IPO) माध्यमातूनही भरघोस परतावा मिळवण्याची चांगली संधी आहे. 1 एप्रिल रोजी चालू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात भारती हेक्झाकॉन (Bharti Hexacom) नावाचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात एसएमई श्रेणीमध्ये एकूण पाच आयपीओ आले आहेत.
पुढच्या आठवड्यात येणार तीन आयपीओ
येत्या ८ एप्रिल रोजी नवा आठवडा चालू होणार आहे. या आठवड्यातही एकूण तीन आयपीओ येत आहेत. हे तिन्ही आयपीओ एसएमई श्रेणीतील आहेत. ८ एप्रिल रोजी तीर्थ गोपीकॉन हा आयपीओ येतोय. ही कंपनी समभाग विक्रीच्या माध्यमातून ४४ कोटींचा निधी उभारणार आहे. १० एप्रिल रोजी डीसीजी केबल्स अँड वायर्स या कंपनीचा आयोपीओ येणार असून ही कंपनी ५० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. १२ एप्रिल रोजी ग्रीनहाईटेक वेंचर्स या कंपनीचा आयपीओ येणार असून ६.३ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे या कंपनीचे लक्ष्य आहे. म्हणजेच पुढच्या आठवड्यात या तीन कंपन्या आयपीओच्या माध्यमातून एकूण 100 कोटींचा निधी उभारणार आहेत.
पहिल्याच आठवड्यात आला भारती हेक्झाकॉमचा आयपीओ
आयपीओ क्षेत्रात नव्या वित्त वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारती एअरटेल या उद्योग समुहाचा भारती हेक्झाकॉम हा आयपीओ बाजारात आला आहे. वित्त वर्ष 2024-25 चा हा पहिलाच आयपीओ ठऱला आहे. 3 एप्रिल रोजी हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. 5 एप्रिलपर्यंत तो समभाग खरेदीसाठी खुला होता. आता मात्र हा आयपीओ बंद झाला असून तो आगामी आठवड्यात बाजारमंचावर सूचीबद्ध होणार आहे. पुढील आठवड्यात भारती हेक्झाकॉमसह एकूण सहा एसएमई क्षेत्रातील आयपीओ बाजारमंचावर सूचीबद्ध होणार आहेत.
आतापर्यंत कोण-कोणते आयपीओ आले?
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारती हेक्झाकॉम नावाचा आयपीओ आला होता. या आयपीओने एकूण 42 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. या कंपनीच्या प्रारंभिक समभागविक्रीला 30 पटींनी अधिक प्रतिसाद लाभला. गेल्या आठवड्यात एसएमई श्रेणीतील एकूण 5 आयपीओ तसेच एकूण 10 नवे शेअर बाजारमंचावर सुचीबद्ध झाले आहेत.
(टीप- लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणतीही कंपनी किंवा संस्थेत आर्थिक गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
हेही वाचा :
ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह', 'या' कंपनीच्या नव्या धोरणाची चर्चा!
'या' पाच बँका देतात FD वर भरघोस व्याज, एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास होणार मोठा फायदा!
आता टेन्शन नाय घ्यायचं! 'या' पाच मार्गांनी तुमच्या कर्जाचा हफ्ता होईल कमी; वाचा A टू Z माहिती