US Fed Interest Rates: अमेरिकेतील महागाई दरात घट झाली असली तरी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पु्न्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. महागाई दरात घट झाल्यानंतर फेडरल रिझर्व्हने काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली आहे. मागील बैठकीत फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्क्यांची व्याज दरवाढ केली होती. 

फेडरल रिझर्व्हने बुधवारी रात्री या व्याज दरवाढीची घोषणा केली होती. त्याशिवाय, महागाई कमी करण्यासाठी 2023 मध्ये देखील व्याज दरात वाढ करणार असल्याचे सूतोवाच फेडरल रिझर्व्हने केले आहे. फेडरल रिझर्व्हची आज युरोपीयन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दरवाढ होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


2023 मध्ये जीडीपी ग्रोथ 0.5 टक्के राहण्याचा अंदाज 


व्याज दरवाढीच्या निर्णयानंतर फेडरल बँकेचा लक्ष्य दर 4.25 ते 4.50 च्या टप्प्यात आला आहे. 2007 नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. वर्ष 2023 च्या अखेरपर्यंत अंदाजित व्याज दर 5.1 टक्के इतका झाला आहे. हा व्याज दर गुंतवणूकदारांच्या अपेक्षेहून अधिक आहे. 


2023 च्या अखेरीस बेरोजगारी दर हा 4.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सध्या अमेरिकेत बेरोजगारी दर 3.7 टक्के इतका आहे. पुढील वर्षात जीडीपी वाढीचा दर हा 0.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 1.2 टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. 


15 वर्षातील सर्वाधिक व्याज दर 


अमेरिकेतील व्याज दर हा मागील 15 वर्ष म्हणजे 2007 नंतरचा सर्वाधिक व्याज दर आहे. 


अमेरिकन शेअर मार्केटमध्ये घसरण


फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बुधवारी, डाऊ जोन्स 0.98 टक्क्यांनी, एस अॅण्ड पी 500 निर्देशांक 1.16 टक्क्यांनी आणि Nasdaq निर्देशांक 1.33 टक्क्यांनी घसरला. गुरुवारी भारतीय शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळू शकते.


भारतीय बाजारावरही नकारात्मक परिणाम?


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ झाल्याचा परिणाम अमेरिकेसह संपूर्ण जगावर दिसण्याची शक्यता आहे. भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह होण्याची शक्यता आहे. यासोबतच रुपयातही घसरण होण्याची शक्यता आहे. फेड रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून येण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: