WPI Inflation: नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा ( Wholesale Price Index) दर 5.85 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मागील 21 महिन्यातील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर आहे. वाणिज्य मंत्रालयाने आज घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी, WPI महागाई दर 10.55 टक्क्यांच्या पातळीवर होता आणि नोव्हेंबरमध्ये 4.70 टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्के होता. तर, मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता.


बुधवारी वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दर महिन्याला घाऊक महागाई निर्देशांकात बदल होत आहेत. ऑक्टोबरमध्ये घाऊक निर्देशांकात 0.39 टक्के वाढ दिसून आली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्यांनी घट झाली. 


अन्नपदार्थ, धातू, कापड, रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या दरातील घट ही घाऊक महागाई दर कमी होण्याचे मुख्य कारण असल्याचे समजले जात आहे. फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई दर हा किरकोळ महागाई दरापेक्षा खाली घसरला आहे.


घाऊक महागाई दरात घट होण्यामागे काही कारणे आहेत. यामध्ये अन्नधान्याच्या महागाईतील घट हे प्रमुख कारण समजले जाते. अन्नधान्याची महागाई ही मागील 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 2.17 टक्क्यांवर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर 6.48 टक्के होता. त्याच वेळी, अन्न निर्देशांक दर महिन्यानुसार 1.8 टक्क्यांवर आला आहे.
 
उत्पादनांचा महागाई दरही घटून 3.59 टक्क्यांवर आला आहे. हा महागाई दर यापूर्वी 4.42 टक्क्यांवर होता. इंधन आणि विजेचा महागाई दरही ऑक्टोबरमधील 23.17 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 17.35 टक्क्यांवर आला आहे.


सोमवारी, किरकोळ महागाईचा दर जाहीर करण्यात आला होता. किरकोळ महागाई दर हा 5.88 टक्क्यांपर्यंत खाली आला. आरबीआयने निश्चित केलेल्या महागाई नियंत्रणासाठी सहा टक्के इतका दर निश्चित केला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महागाई दरामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 


दरम्यान, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.77 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांवर घसरला. सलग 10 महिन्यांनंतर प्रथमच, महागाई दर RBE च्या 2 ते 6 टक्क्यांच्या निश्चित मर्यादेत आला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दरही नोव्हेंबरमध्ये घसरला आणि तो 4.67 टक्के राहिला. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाई 7.01 टक्के होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या: